– युती-आघाडीचेही संकेत चर्चेत.
मारेगाव – विटा न्युज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभा मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी नुकत्याच झालेल्या पक्ष बैठकीत हा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली.०२ डिसेंबर रोजी होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसेनेही कंबर कसली असून, वणी नगरपालिकेसह मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आह. राजू उंबरकर आणि कार्यकर्त्यांची फळी सातत्याने जनसंपर्कात राहून जनहिताची कामे करत असल्यामुळे, या निवडणुकीत मनसेला मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.
युती आणि आघाड्यांचे संकेत – राजकीय चर्चा
एकीकडे मनसे स्वबळावर लढण्याचा नारा देत असताना, दुसरीकडे युती आणि आघाडीचे संकेत देणाऱ्या राजकीय चर्चांनाही जोर धरला आहे.
भावडांची संभाव्य युती
भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राज्य पातळीवर भाजपविरोधी पक्ष एकत्र येण्याची तयारी करत आहेत. राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे (सेना ठाकरे गट) आणि राज ठाकरे (मनसे) या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर ही युती झाल्यास, वणी विधानसभा मतदारसंघात विधानसभेत वर्चस्व असलेला ठाकरे गट आणि मनसेची मोठी कार्यकर्त्यांची फळी व जनसंपर्काची नाळ या जमेच्या बाजू ठाकरे बंधूंच्या युतीसाठी फायद्याच्या ठरू शकतात असा कयास व्यक्त केल्या जात आहे. परिणामी ,काँग्रेस, राष्ट्रवादीसह, बसपा (बहुजन समाज पक्ष), कम्युनिस्ट पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढल्यास भाजपचे अश्व रोखण्यास मदत होईल,अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.