
– शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
दिल्लीतील जंतर मंतर येथे पेपर लीक प्रकरणी जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करीत आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यावर केलेल्या कथित लाठीचार्जचा मारेगाव येथे तीव्र निषेध करण्यात आला.
मारेगाव तालुका सर्वपक्ष व विविध सामाजिक संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसह पालकांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.जंतर मंतर वर सुरु असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यावरील लाठीचार्जचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येवून पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात विद्यार्थी, पालक, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.आंदोलन वेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. देशातील शिक्षण व्यवस्थेतील विद्यार्थी व पालकांचा विश्वास कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने पारदर्शक व जबाबदार भूमिका घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.पेपर फुटीने जीवन संपविलेल्या व आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांस याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली.
तहसील प्रशासनास निवेदन देत आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलनात विविध राजकीय पक्षाचे आणि सामाजिक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.