– बोरीखुर्द वासियांचा आंदोलनाचा गर्भीत ईशारा : प्रशासनास निवेदन
– स्मशानभूमीच्या जागेसाठी वनविभागाचा ग्रीन सिग्नल
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
गत काही वर्षांपासून स्मशानभूमी उभारणीच्या मागणीला प्रशासनाकरवी ठेंगा दाखवित असल्याने संतप्त नागरिकांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात नेवून अंत्यविधी केल्याने कमालीची खळबळ उडाल्याने ग्रा. पं. प्रशासनाने पोलिसात धाव घेतली. परिणामी काही लोंकावर गुन्हे दाखल झाल्याने सदरील गुन्हे मागे घेवून रस्त्यासह स्मशानभूमीची उभारणी करा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा गर्भीत ईशारा बोरींखुर्द वासियांनी आज दि. 30 ला प्रशासनास दिलेल्या निवेदनातून दिल्याने हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.
तालुक्यातील बोरींखुर्द वासियांचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा जटील प्रश्न मागील अनेक वर्षांपासून मागावर आहे.बोरींखुर्द वगळता धामणी व भालेवाडी हे तीन गावे मिळून गटग्रामपंचातची उभारणी झालेल्या जवळपास 450 लोकसंख्या असलेल्या बोरींखुर्द गावाला स्मशानभूमीची जागाच लालफितीत अडकली आहे. आजतागायत वनविभागाच्या जागेवर अंत्यसंस्कार होत असतांना स्मशानभूमी उभारणी करिता निधी उपलब्ध होत नाही आणि पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील अंत्यसंस्काराचा प्रश्न कमालीचा गंभीर झाला आहे.

स्मशानभूमी आणि रस्ता या प्रमुख मागणीसाठी यापूर्वी नागरिकांनी ग्रामपंचायत सह तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन दिलेत मात्र नागरिकांच्या निवेदनास केराची टोपली दाखविण्यात आली आणि हा गंभीर प्रश्न जैसे थे च्या अवस्थेत राहील्याचा आरोप नागरिकांचा आहे.
अलीकडेच पावसाळ्याला सुरुवात झाली आणि स्मशाभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. संतप्त नागरिकांसह आप्तेष्ठान्नी दोन दिवसापूर्वी वार्धक्याने मृत्यू झालेल्या वृद्ध मृतदेहच थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेवून अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रशासनास विचलित करणाऱ्या या अनाहुत घटनेचे तीव्र पडसाद उमटताच ग्रामसेवक केराम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.बोरींखुर्द येथील चौघे कायद्याच्या कात्रीत सापडत त्यांचेवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याने गावकर्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी आता आंदोलनाची वज्रमूठ बांधली आहे.
दरम्यान, बेदखलच्या न्यायिक मागणीसाठी उभारलेल्या अघोषित कृत्याचा परिपाक गुन्ह्यात परिवर्तीत झाल्याने हे गुन्हे तात्काळ मागे घ्या आणि स्मशानभूमी साठी होत असलेली नागरिकांची परवड थांबवा अन्यथा यापुढे उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा ग्रामस्थांनी तालुकासह जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनातून दिल्याने हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वन विभागाचा ग्रीन सिग्नल
बोरींखुर्द येथील घटनेची गंभीर दखल घेत उपवन रक्षक प्रादेशिक वन विभाग पांढरकवडा यांनी पेसा अंतर्गत येणाऱ्या बोरींखुर्द ग्रामपंचायतचा प्रस्ताव हमीपत्रासह अधिसूचनेची प्रत सादर करण्याचे गटविकास अधिकारी मारेगाव यांना पत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे अवघ्या दिवसातच स्मशानभूमीचा मार्ग सुकर होण्याच्या शक्यतेला बळ मिळाल्याचे संकेत प्राप्त झाले आहे.