– व्यावसायिकांमध्ये खळबळ : पानटपऱ्या, हॉटेल तडकाफडकी बंद : दोन दुकानातील नमुने थेट प्रयोगशाळेत पाठविणार
मारेगाव : दीपक डोहणे
नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच भेसळयुक्त अथवा नियमबाह्य अन्नपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने मारेगाव शहरात धडक तपासणी मोहीम राबवली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी करत अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक, स्वच्छता तसेच आवश्यक परवाने व कागदपत्रांची पाहणी केली. येथील स्वीट बेकरी व किराणा मॉल संशयास्पद आढळलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त व प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. अलीकडेच विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये संशयित अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न प्रशासन अधिकारी डॉ. सचिन नरवडे यांनी “विटा “ला दिली.
दरम्यान, प्रशासकीय पथक मारेगावात धडकताच ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. याचीच धडकी घेत शहरातील पानटपऱ्या व हॉटेल्स तडकाफडकी बंद झाल्या. वृत्त लिहीपर्यंत पथकाची नमुने तपासणीची कागदोपत्री कारवाई सुरु होती. सदर जप्त नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.