बँक निवडणूकीत आघाडीचा बुरखा फाटला

 

– बाहेरून कीर्तन आतून तमाशा दिसून पडला 

साऱ्या देशात सत्तेविरुद्ध इंडिया आघाडी प्राणपणाने लढत आहे. लोकशाही धोक्यात आली म्हणून भाजप विरोधात इतर बहूतांश विरोधी पक्ष एक झाले आहे. महाराष्ट्र सुद्धा “पन्नास खोके एकदम ओक्के” चे राजकीय नाट्य घडल्यानंतर उबाठा राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी महाविकास आघाडी तयार केली व रणशिंग फुंकले. इकडे वणी विधानसभा क्षेत्रात मात्र मोठा धिंगाणा सुरु आहे.महाविकास आघाडीचे स्थानिक राजकारणी आपला वेगवेगळा तोरा दाखवून आघाडी मध्ये बिघाडी करण्याचे काम पूर्ण इमाने इतबारे पार पाडत आहे.

नुकतीच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली. महाविकास आघाडी तर्फे आमदार संजय देरकर यांच्या अर्धांगिनी किरणताई देरकर या निवडणुकीत उभ्या राहिल्या व जिंकल्या देखील. परंतु महाविकास आघाडीमध्ये असलेले गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेचा लॉलीपॉप चाखणाऱ्या नेत्यांचा “महाभकास” चेहरा मात्र पूर्ण उघड झाला.

स्वतःसाठीच मते मागतांना महाविकास चे तुणतुने वाजवायचे व त्यातून निवडून येवून मस्त पद भोगायचे, मात्र इतर मित्र पक्षांच्या उमेदवारा विरुद्ध कटकरस्थान रचून त्यांना पाडण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा अशी महाविकास आघाडीची कुरघोडी व दुटप्पी भूमिका आहे. हे बघून त्यांच्या पाठीशी असणारा सामान्य वर्ग पुरता वैतागला आहे. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रात बँक निवडणुकीत मारेगावात किरण देरकर,झरी मधून राजीव येल्टीवार हे उभे होते. महाविकास मधून वणी करिता पूर्वी सुनील कातकडे उभे राहण्यास इंच्छुक होते पण तेथेही कापाकापीचे राजकारण खेळत त्यांची तिकीट कापली. परंतु हे तिघेही दिग्गज मनोभावे लढले व जिंकले देखील. महाविकास उमेदवार चे पाठीशी यावेळी केवळ निष्ठावंत म्हणून माजी आमदार वामनराव कासावार हे एकमेव नेते मात्र खऱ्या अर्थाने व पूर्ण ताकदीने झटले.मात्र पती नंतर पाठोपाठ आमदार व नंतर खासदार झालेल्या प्रतिभाताई यांनी आघाडी मध्ये पूर्ण बिघाडी करत आपली चूल वेगळी मांडली. त्यांचाच कित्ता गिरवीत काँग्रेसची गांधी टोपी घालून अनेक पदे भोगलेले नरेंद्र ठाकरे यांनी चक्क राज धर्म खुट्याला टांगला. राजकारणाची धड ए.बी. सी.डी.माहिती नसलेले त्यांचे पुत्र सारंग ठाकरे यांनाच किरणताईच्या विरोधात उभे करून मोठा दारुण पराभव पदरी पाडून घेतला.

 

या निवडणुकीत पक्षाच्या भरोशावर अनेकवेळा सत्ता भोगलेले अरुणाताई खंडाळकर यांची संशयित भूमिका बुचकाळ्यात टाकणारी ठरल्याचे चर्चील्या जात आहे. आघाडीतूनच एवढे मोठे षडयंत्र रचत असतांना सुद्धा हे आव्हान आ. संजय देरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांनी कुशाग्र पद्धतीने लिलया पेलले व बंडखोरीचे टेंभे मिरविणाऱ्या नेत्यांना यशस्वी धोबीपछाड दिली.

स्वतःच्या निवडणुकीत लोकांना मागे फिरवायचे व दुसऱ्याच्या निवडणुकीत मदत करणाऱ्यांचेच तंगडे ओढायचे अशा वृत्तीच्या नेत्यांना यावेळी मोठी चपराक बसली, एवढे मात्र खरे. अश्या संधीसाधू व बंडखोर नेत्यांना या निवडणूकीमुळे एखाद्या “गुफेत” बसून आठ दिवस आत्मचिंतन करण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.

✍️दीपक डोहणे

संपादक,विदर्भ टाईम्स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment