– AISF चा पुढाकार
मारेगाव: विटा न्युज नेटवर्क
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) च्या वतीने दि. 27 ला मारेगाव येथे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर निदर्शने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील प्रश्न बनलेल्या महाराष्ट्रातील बंद झालेल्या सर्व जिल्हा परिषद शाळा तात्काळ पुन्हा सुरू कराव्यात, बंद होऊ घातलेल्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद करू नयेत, रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत, परीक्षा प्रक्रियेत होणारी पेपरफुटी कायमस्वरूपी थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) रद्द करावे, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच राज्यातील शिक्षण व परीक्षा व्यवस्थेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रमुख आग्रही मागण्या करण्यात आल्या.
या सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. अन्यथा विद्यार्थी हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा AISF च्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात कॉ. अथर्व निवडिंग, कॉ. अभिजीत नगराळे, कॉ. पियुष सोनुले, कॉ. अनुष्का आत्राम, कॉ. आदे यांच्यासह AISF चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.