पदवी म्हणजे नवीन स्पर्धेची सुरुवात – प्रा.डॉ.हरिदास धुर्वे

 

– मारेगाव कॉलेज मध्ये पदवीदान समारंभ

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

बालपणापासून आपण जे शिक्षण घेतो ते शिक्षण पदवी पर्यंत आल्यानंतर थोडा विसावा घेते आणि येथूनच नवीन जगाची व स्पर्धेची सुरुवात होते. बरेच विद्यार्थी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर थांबतात परंतु जीवनाच्या खऱ्या संघर्षास येथूनच सुरुवात होते. आज पर्यंत आपण घेतलेला शिक्षणाचा वापर येथून खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरतो. कारण येथूनच जीवघेण्या स्पर्धांना देखील सुरुवात होते. यासाठी आपण जर आपल्या विचारांसोबत प्रामाणिक राहिलोत तर आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये सहज जिंकू शकतो आणि जीवनात सुद्धा यश संपादित करू शकतो, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा बाबाजी दाते कला, वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील प्रा.डॉ.हरिदास धुर्वे यांनी व्यक्त केलेत.

मारेगाव येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभानिमित्त ते मुख्य अतिथी म्हणून आपले विचार मांडत होते.

 

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.जी. ग.कापसे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे सचिव सुधीर दामले, सहसचिव ॲड्.भास्करराव ढवस, प्राचार्य हेमंत चौधरी तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे उपस्थित होते.

 

अध्यक्षीय भाषणातून जी. ग.पाटील कापसे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडताना आपण ज्या क्षणापासून सुरुवात केली तो क्षण कितीही महत्त्वपूर्ण वाटत असला तरी त्यानंतर केलेले परिश्रम आणि संपादिलेले यश आणि या यश निर्मितीसाठी घेतलेल्या मेहनतीचे क्षण अधिक मौल्यवान ठरलेत, असे मौलिक विचार त्यांनी यावेळी व्यक्त केलेत.

प्राचार्य डॉ.अविनाश घरडे यांनी सध्यास्थितीत असलेला अभ्यासक्रम आणि येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रम यांचा तुलनात्मक आढावा घेतला. येणारे शिक्षण हे निश्चित आव्हानात्मक असले तरी आपली कणखर, प्रामाणिक मानसिकता या आव्हानावर सहजपणे विजय प्राप्त करू शकते. असा कणखर आत्मविश्वास त्यांनी आपल्या भाषणातून येथे व्यक्त केला.

 

यावेळी पदवीदान समारंभाच्या माध्यमातून कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखांतील यशवंत विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच माजी विद्यार्थ्यांसह येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.वर्षा गणगणे यांनी तर आभार प्रा.डॉ.विभा घोडखांदे यांनी व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment