पंचक्रोशीत हळहळ… अखेर सहा वर्षीय बालकाचा मृतदेहच आढळला

 

– गदाची बोरी येथील नाल्यात मृतदेह; घातपाताचा संशय,

– पाच पोलिस पथकांकडून चौफेर तपास

कुंभा : कैलास ठेंगणे 

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह गुरुवारी (ता. २२) गावापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गदाची बोरी येथील नाल्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चेतन ऊर्फ चिक्या मनोज चांदेकर असे मृत बालकाचे नाव आहे.

गत बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या या बालकाचा मृतदेह आढळल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, त्याचा घातपात करण्यात आला असावा, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे चांदेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कुंभा येथील रहिवासी मनोज रामदास चांदेकर हे रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी (ता. २१) सायंकाळी २२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ते कामावरून घरी परतले असता त्यांचा सहा वर्षीय मुलगा चेतन घरी दिसून आला नाही. पत्नी आणि चार वर्षीय मुलीकडे विचारणा केली असता, चेतन दुर्गादेवीच्या मंडपात मित्रांसोबत खेळत असल्याचे समजले. त्यानंतर वडिलांनी तातडीने मंडपात जाऊन शोध घेतला; मात्र तो तेथे आढळला नाही.

मंडप परिसरात चौकशी केल्यानंतर वडिलांनी गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र, मुलाचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाला पळवून नेले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली होती.

शोधमोहीम सुरू असतानाच मृतदेह आढळला

बालक बेपत्ता झाल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी पाच पथके तयार केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवी आणि मारेगावचे ठाणेदार सागर दानडे यांच्यासह सुमारे ४० ते ४५ पोलिस कर्मचारी शोधकार्यात सहभागी झाले होते. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या संयुक्त के-९ पथकाच्या मदतीनेही घटनास्थळाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कुंभा गावापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गदाची बोरी येथील नाल्यात चेतनचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे सुरू असलेल्या शोधमोहीमेची अखेर दुःखद ठरली.

घातपाताच्या संशयाने प्रकरणाचे गांभीर्य वाढले

सहा वर्षीय बालकाचा मृतदेह गावापासून दूर सहा किमी. च्या नाल्यात आढळल्याने त्याच्या मृत्यूमागे घातपात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी आणि पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासली जात आहे.

चिमुकल्या चेतनच्या मृत्यूमागील धवल सत्य उघड होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment