– शहरात खमंग चर्चेला उधाण
मारेगाव : दीपक डोहणे
येथील दोन नगर सेवकांनी जन्मदिवस साजरा करण्याच्या पार्टीत धाब्यावर एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मनसोक्त तुडविले. पोळ्याच्या दोन दिवसा पूर्वीच नगर सेवकांची ही मजेदार “बैल टक्कर” अनेकांनी याची देही, याची डोळा अनुभवली. तर्र अवस्थेत असलेल्या या दोन महान समाज सेवक यांनी यावेळी बराच वेळ एकमेकांच्या आई बहिणीचा उद्धार केला. शहर विकासाची जबाबदारी असणारे हे दोन नगरसेवक बराच वेळ एकमेकांच्या उरावर बसले होते. या जोरदार हाणामारी चा मनोरंजनात्मक तमाशा करून उपस्थितांची ते मोफत करमणूक करत होते.
मारेगाव येथे पूर्वी ग्राम पंचायत होती. जुन्या काळात अनेक सोज्वळ आणि प्रतिष्ठित लोकांनी सरपंच हा बहुमान मिळविला व तो टिकवून सुद्धा ठेवला. गावकरी त्यांचा आदर करीत होते.
गत काही वर्षांपासून शहरात नगर पंचायत अस्तित्वात आली. यात काही प्रतिष्ठित लोक नगर सेवक म्हणून निवडून आले. त्यांनी आपली प्रतिष्ठा पुरेपूर जोपासली, आजही ते जोपासत आहे. परंतु दुर्दैवाने नगर सेवक या महत्त्वपूर्ण पदावर काही हवसे गवसे सुद्धा निवडून आले. त्यातून सत्तेची नशा अन् माज आपसूकच चढत गेला. त्यातून काहींनी या पदाची प्रतिष्ठा पूर्ण धुळीस लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. शहर विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणे अपेक्षित असतांना केवळ लोकांकडून तोडी करणे, संध्याकाळी तर्र होऊन धिंगाने घालने, स्वयम एक नंबर समजून दोन नंबर करणे असा एक कलमी कार्यक्रम काही नगर सेवक करीत आहे.
नुकताच एक वाढदिवस साजरा करण्यात आला. यात दोन नगरसेवक यांना सोमरस जरा जास्त झाल्याने क्षणात त्यांनी एकमेकांच्या आई आणि बहिणीचा भर सार्वजनिक ठिकाणी उद्धार करणे सुरू केले. यात एक बेरोजगार धमकी मास्टर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्याने दुसऱ्याची कॉलर पकडली. एकमेकांची लक्तरे वेशीवर टांगून लाथाबुक्कांनी झोडपणे सुरू केले. हा “ऐतिहासिक” धिंगाणा बराच वेळ लोकांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतला. हेच का आपले सन्मानीय नगर सेवक म्हणून अनेकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. सध्या या प्रकारची खमंग चर्चा मारेगावात सुरू आहे.