– गुणकारी असूनही माठांकडे बगल
– आधुनिक जीवनशैलीमुळे कुंभार समाजावर आर्थिक संकट गडद
मारेगाव : दीपक डोहणे
बदलत्या काळानुरूप मानवी जीवनात कमालीचा व्यापक बदल झालेला दिसतो आहे. रखरखत्या उन्हात शरीराराची काहीली होतांना मानवी मन थंडगार पाण्यासाठी इलेक्ट्रिक फ्रीज कडे अलगद वळतो व आपली क्षणिक तृष्णा भागवितो.त्यामुळे ‘देशी फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठावर कमालीचा परिणाम बघावयास मिळतो आहे.
काही दशकापूर्वी रस्त्यावरील गावाच्या रोडलगत आणि ग्रामिण भागातील बैलबंडीने आणणाऱ्या आठवडी बाजारात गजबजलेला माठांचा बाजार असायचा. बाजारातून मोठ्या प्रमाणात हातात माठ घेवून जाण्याचे चित्रच पालटले आहे.आजच्या आधुनिक वातावरणात माठांची जागा इलेक्ट्रिक फ्रिजने घेतली आहे.
देशी फ्रीज नावाने प्रसिद्ध असलेला माठ स्वस्त आणि किफायतशीर आहे.ते तयार करण्यासाठी मातीचा वापर केल्या जातो. त्यामुळे जेव्हा आपण त्यात भरलेले पाणी वापरायला सुरुवात करतोय तेव्हा त्यातील जीवनसत्वे, खनिजे, प्रथीने, लोह आपल्या शरीरात पोहचतात. नैसर्गिक साधनसंपत्तीपासून बनवलेले माठातील पाणी शुद्ध आणि आरोग्यदायी मानले जाते मात्र आरोग्यासाठी सकारात्मक असलेल्या या देशी फ्रीज चा ट्रेंड कमी होतांना दिसतो आहे.
रखरखत्या उन्हात प्रामुख्याने माठातील पाणी तिन्ही ऋतुत पाणी पिणे निरोगी राहण्यासाठी फायदेशीर असते. आयुर्वेदातही मातीच्या भांड्यातील अन्न शिजविणे, पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले गेले आहे. मात्र याकडे सपशेल बगल देण्यात येवून याचा विपरीत परिणाम आधुनिक जीवनशैलीमुळे कुंभार समाजबांधवावर आर्थिक संकट गडद होण्यावर झाला आहे.