– 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत अफरातफरचा ठपका : सहकारी मात्र मोकाट?
– चिंचमंडळ ग्रामपंचायत मध्ये होते कर्तव्यावर
मारेगाव : दीपक डोहणे
भ्रष्ठाचाराचा कळस गाठलेल्या व सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील तात्कालीन ग्रामसेवक आनंद धनगर यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने पंचायत समिती वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील चिंचमंडळ येथे सन 2022/23 या आर्थिक वर्षात 15 व्या वित्त आयोगाचा तब्बल 9 लाख रुपयाच्या निधीतून तोडक्या रकमेची घंटागाडी व डझबीन खरेदी करून अधिकचे देयके दाखविण्यात आले. खरेदी केलेल्या साहित्याचे स्थानिक प्रशासकीय स्थरावर कॅशबूक उपलब्ध नाही. त्यामुळे सदर योजनेत ‘व्हाईट कॉलर’ स्वयंघोषित पुढाऱ्याच्या संगनमताने भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार करण्यात आली.
बराच काळ ही तक्रार फाईलबंद ठेवण्यात आल्यानंतर कारवाईला भोपळा दाखविण्यात आला.याविरोधात ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी दंड थोपटून उपोषणाचे हत्यार उपसले. नव्हेतर संरक्षण भिंत निधीतील पाच लाखाचा भ्रष्टाचार विरोधात तब्बल सहा ग्रा. पं. सदस्यांनी मासिक मिटिंगची नोटीस न काढता संगनमताने परस्पर निधीची उचल करण्यात आल्याने गत तीन वर्षांपासून कामकाजावार बहिष्कार टाकत तक्रारीचा रेशो कायम ठेवला.
मारेगाव प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची चौकशी करीत जिल्हा स्थळावर अहवाल पाठविला.चिंचमंडळ येथील तत्कालीन ग्रामसेवक आनंद धनगर यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र यात सहभागी ‘व्हाईट कॉलर’ स्वयंघोषित पुढारी मोकाट असल्याने त्याचे विरोधात तक्रारीचा ससेमीरा सुरु ठेवणार असल्याची माहिती तक्रारदाराने ‘विदर्भ टाईम्स’ बोलतांना दिली.
दरम्यान, निलंबनाचे अधिकृत पत्र मारेगाव प्रशासनात धडकले नसले तरी निलंबन झाल्याच्या पुष्टीला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
या कारवाईच्या घटनेने पंचायत समिती वर्तुळात पुरती खळबळ उडाली आहे.