– महिलांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस
दीपक डोहणे : मारेगाव
येथील बहुचर्चित अन् तितकीच वादग्रस्त दारू दुकानाचा पूर्व इतिहास अगदीच काळाकुट्ट आहे. बनावट व नकली कागदपत्रांवर मौजा खैरी येथे देशी सुरू करण्याच्या प्रयत्नाला उच्च न्यायालयाने चांगलाच चाप लावला होता. यानंतर दारू विक्रेता याचे कडून मारेगावं शहरात एका ठिकाणी पुन्हा दारू दुकान उघडण्याचा डाव डाव झाला. पण तो सपशेल आपटला. तेथे तुंबळ हाणामारी झाली अन् जागेवरच एकाला “परम आनंद” प्राप्त झाल्याने पुन्हा दुकानदारी बंद पडली.
सौ परीनिता परमानंद जयस्वाल हिचे खैरी येथील दारू दुकानला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यानंतर सदर परवानाधारक यांनी त्यावेळी ग्रामपंचायत मारेगाव येथील तत्कालीन वादग्रस्त ग्रामसेवक याला हाताशी धरून बनावट व नकली ना हरकत ठराव मंजूर करून घेतले. परंतु सदर नकली ग्रामपंचायत ठराव बाबत त्यावेळेस मारेगाव येथील काही सुज्ञ युवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. कोणतीही ग्रामसभा न होता केवळ नकली सही शिक्क्यांचा वापर करून या दारू दुकानाला परवानगी दिलीच कशी म्हणून ग्रामसेवक व परवाना धारक यांना सडेतोड प्रश्न विचारले. खूप तक्रारी झाल्या.सदर ठरावाबाबत काही युवकांनी जिल्हा परिषद यवतमाळच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार केली. यात चौकशी झाल्यानंतर हा ठराव नकली असल्याचे सिद्ध झाले. परंतु पुन्हा परवानधारकाने कुटील कारस्थान करून प्रभाग क्रमांक 13 मध्ये एका घराजवळ ही दारू दुकान चालू करण्याचा प्रयत्न केला. मग अखेरचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी ऐन दुकान सुरू होण्याच्या एक रात्र पूर्वी, दारु दुकानदार चे पती परमानंद जयस्वाल यांना स्थानिक लोकांनी प्रचंड मारझोड केली. तुफान दगडफेक करून त्याची कार फोडून टाकली. इतकेच नाही तर त्याच्या विरोधात विनयभंग, जातीवाचक शिवागाळ व इतर स्वरूपाचे मारेगाव पोलिसात गुन्हे दाखल झाले. त्यावेळी बराच वादंग झाला. अखेर पोलसांनी येथे दुकान सुरू झाल्यास जातीय दंगल घडू शकते असा गंभीर अहवाल वरिष्ठांना पाठविला. मग ही दुकानदारी मार्डी रोडवर हलविण्यात आली.
त्यामुळे हे वादग्रस्त दुकान काही वर्ष मारेगाव येथे मार्डी रोडवर चालू राहिली. परंतु पुन्हा एकदा या दुकानाचा प्रवास आता येथील बुद्ध विहार जवळच येऊन पोहोचला.
यामुळे आता या दुकान स्थलांतर विरुद्ध कमालीची चीड निर्माण झाली आहे. मार्डी रोडवर दुकान सुरळीत सुरू असतांनाच आणि परवाना धारकाच्या कुटुंबात चार पाच दारू दुकान सुरू असतांना नेमके बुद्ध विहार जवळच हे दुकान सुरू करण्याची हाव व खाज जयस्वालला का झाली असा संतप्त सवाल. उपोषणकर्त्या महिला विचारत आहे.
या बहुचर्चित दुकान विरुद्ध आजचा उपोषणाचा चौथा दिवस असून आता हे आंदोलन पुन्हा अधिक आक्रमक होण्याच्या मार्गावर आहे.