देशीचा पंचनामा भाग (1) बांधकाम प्रमाणपत्र नाही.. तरी दारू दुकानाची घाई…!

 

– नगरपंचायत ने दिले नाही भोगवटा प्रमाणपत्र 

– महिलांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस 

मारेगाव : दीपक डोहणे 

येथील बहुचर्चित व वादग्रस्त देशी दारू दुकानाचे एक एक कांड आता समोर येत आहे. या दारू दुकानाला इमारत बांधकाम पूर्णत्वाचे नगरपंचायत प्रशासन मारेगाव यांनी आवश्यक असलेले भोगवटदार प्रमाणपत्र दिले नाही. हे प्रमाणपत्र असल्याशिवाय हे दुकान सुरू करण्यात आले आहे.

 

मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये बौद्ध विहार जवळ नव्यानेच थाटलेले सौ. परिणीता परमानंद जयस्वाल हिचे देशी दारू दुकाना समोर या प्रभागातील लोकांनी व महिलांनी आता आंदोलन छेडत विरोध सुरू केला आहे. शांतताप्रिय बौद्ध विहार जवळच या वादग्रस्त दुकानाची मांडणी झाल्याने परिसरातील नागरिक आता कमालीचे संतापले आहे.

 

प्रशासनाने हे दुकान सुरू करण्याची परवानगी देण्याआधी किमान या बौद्ध विहाराचा आणि येथील शांततामय जीवन जगणाऱ्या नागरिकांचा विचार करणे गरजेचे होते. येथील लोकांच्या शांत व आनंदमय जीवनात देशी दारूचे दुकान घुसळणे प्रशासनाला इतके आवश्यक वाटत होते का? असा संतप्त सवाल येथील महिला प्रशासनाला विचारीत आहे.

 

सदर देशी दारू दुकान ज्या इमारत मध्ये सुरू आहे ती इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगरपंचायत, महानगरपालिका व औद्योगिक नगर परिषदा अधिनियम नुसार इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगरपंचायत च्या अभियंत्याकडून सदर बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे व असलेल्या दिशा निर्देशाप्रमाणे पूर्ण झाले की नाही ते पाहण्यात येते व त्यानंतर त्या ईमारतीचा वापर करता येऊ शकतो अशा आशयाचे बांधकाम पूर्णत्व झाल्यानंतर भोगवटदार प्रमाणपत्र देण्यात येते परंतु गंभीर बाब अशी आहे की, या देशी दारूला मारेगाव नगरपंचायतने भोगवटदार प्रमाणपत्र दिलेलेच नाही यामुळे परवानाधारक जयस्वाल यांनी स्वतःचेच नियम घालून टाकले आहे. स्थानिक खाजगी अभियंता कडून त्याने हे प्रमाणपत्र मिळवून घेतले मात्र असे खाजगी प्रमाणपत्र हे कायद्यात बसत नाही परंतु प्रशासनाचे प्रमाणपत्र नसल्यानंतरही नाकावर लिंबू टिचून परवानधारक यांनी वरिष्ठांना हाताशी धरून ही परवानगी नसताना दारू दुकान चालू करण्याची मंजुरात घेतली आहे.

 

आता यावर महिला कमालीच्या संतप्त झाल्या आहे. साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून या आंदोलनाला आता आणखी उग्र करण्याचा मानस उपोषणकर्त्या महिलांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाकडून आज मंगळवार ला तहसीलदार उत्तम निलावाड, ठाणेदार संजय सोळंखे, अबकारी निरीक्षक संजय बोडेवार यांनी वरिष्ठ दरबारी हे गंभीर प्रकरण मांडू व तात्काळ निवाडा करू असे सांगताच उपोषणकर्त्या महिलांनी आधी बंदचा आदेश नंतरच उपोषण मागे ही कठोर भूमिका घेतल्याने आता हे आंदोलन नेमके कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment