– उपोषणाचे उगारले हत्यार
– स्थानिक प्रशासनाचा विरोध झूगारून थाटले दुकान : सर्वत्र संतापाची लाट
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव प्रभाग 12 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा विरोध झूगारून देशी दारूचे दुकान थाटले असून शांतीचे प्रतीक असलेल्या बुद्ध विहार जवळच असलेल्या हे बहुचर्चित दुकान कायम बंद करा या प्रमुख मागणीसाठी येथील महिलांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.वरिष्ठ प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.
मारेगाव येथील मार्डी रोडवर असलेले देशी व विदेशी दारू दुकानाची इमारत जीर्ण झाल्याचे कारण देत मार्डी येथील अनुज्ञप्ती धारकाने देशी दारू दुकान थेट बुद्ध विहार जवळ हलविले. त्यामुळे येथील शांतता भंग होत जातीय तेढ निर्माण होण्याची संभाव्य शक्यता बळावली आहे.यात स्थानिक प्रशासनाची परवानगी नसतांना वरिष्ठ प्रशासनाशी साटेलोटे करीत बनावट कागदपत्रे सादर करून सदर दारू दुकानाचा घाट मांडल्याचा आरोप होत असतांना सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
परिणामी , मार्डी रोडवरील अवघ्या पंधरा वर्षात इमारत जीर्ण झाली असेल तर विदेशी दारू दुकान कसे सुरु आहे? हा अनुत्तरीत प्रश्न व संशोधनाचा विषय प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत असतांना सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत सदरील अनुज्ञप्तीचे धारकांचे मुजोऱ्यांचे आलेख दिवसागणिक वाढत आहे.
दरम्यान, मारेगाव बुद्ध विहाराजवळील बनावट कागदपत्राच्या आधारे उभारलेले देशी दारूचे दुकान आणि त्यामुळे शांतीचे प्रतीक असलेले संवेदनशील धार्मिक स्थळी आगामी काळात जातीय सलोख्याला सुरुंग लागू नये यासाठी हे बहुचर्चित देशी दारू दुकान कायम बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी येथील पूजा तेलंग, अश्विनी खाडे, नूतन तेलंग, मोनाली रायपुरे, रुपाली वनकर, शिला तेलंग, सोनिया पाटील, तुळसा तेलंग, सुकेशनी पाटील, शीतल तेलंग, वैशाली तेलंग, सोनू पाटील, कविता ताकसांडे, लता वनकर, सारिका पाटील, स्मिता खैरे, पूनम पुनवटकर, प्रतिभा चौधरी, इंदिरा ताकसांडे, वर्षा तामगाडगे, केशर रायपुरे, सुलताना कुरेशी, जमीला शेख,रुपाली पाटील, प्रियंका रायपुरे आदी महिलांनी साखळी उपोषणाचे हत्यार आज सोमवार पासून उगारले आहे.