मारेगाव ग्रामसेवकावर कारवाईची टांगती तलवार?

 

– आर्थिक व्यवहाराचा कोणताही अभिलेखे नसल्याचा ठपका 

– कारवाईचा प्रस्ताव जिल्हास्थळी 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील एका ग्रामपंचायत मध्ये सन 2023 /24 या आर्थिक वर्षात लाखो रुपयाचा अपहार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असतांना तशा आशयाचा अहवाल जिल्हाधिकारी स्थळी पाठविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती ‘विदर्भ टाईम्स’ ला प्राप्त झाल्याने या बहुचर्चित ग्रामसेवकावर नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरालगत असलेली ग्रामपंचायत भ्रष्ठाचाराने पोखरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पदाधिकारी व सचिवाच्या एडेलतट्टू धोरणाने आणि हम करे सो कायद्याने येथील चक्क पाच ग्रामपंचायत सदस्यांनी मागील तीन वर्षांपासून सामूहिक बहिष्कार टाकून केवळ दोघा तिघांवर ग्रामपंचायतचे कामकाज चालत आहे.

 

कामकाजात कुणाचा हस्तक्षेप नको म्हणून सैरभैर झालेल्या ग्रामपंचायतमध्ये प्रमाणके, दैनंदिन कॅशबुक, कामाचे अंदाजपत्रक,ई टेंडर मोजमाप पुस्तिका उपलब्धच नसल्याची माहिती विस्तार अधिकारी यांचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आली आहे.त्यामुळे लाखो रुपयांचा अपहार झाल्याची पुष्टी मिळत आहे.

 

दरम्यान, पंचायत समिती मार्फत संशयास्पदाचा अहवाल जिल्हास्थळी पाठविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती असल्याने या बहुचर्चित ग्रामसेवकावर नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*सदस्य, ग्रामस्थ यांच्या आंदोलनाला केराची टोपली*

लाखो रुपयांचा अपहार झाल्याने याची निःस्पृह चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी तब्बल अर्धा डझन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ फेब्रुवारी 2022 मध्ये उपोषण करीत आंदोलन केले होते. केवळ चौकशी व पोकळ आश्वासनाची खैरात करीत उपोषणाचा मंडप गुंडाळण्यात आला.मात्र, या आंदोलनाची दखल जिल्हा परिषदने घेत चौकशी कारवाईचे पत्र स्थानिक प्रशासनास देत अहवाल सादर करण्याचे लेखी निर्देश दिले. मात्र, नेमके कुठं पाणी मुरले हे न उलगडणारे कोडे भ्रष्ठाचार प्रकरण थंडबस्त्यात ठेवण्यात कारणीभूत ठरले. तूर्तास तक्रारीच्या सातत्याने ह्या प्रकरणाने पुन्हा उभारी घेतली आहे.

 

*कारवाई न झाल्यास 24 जानेवारीपासून आमरण उपोषण*

15 वा वित्त आयोग, सामान्य निधी, पाणी पुरवठा निधीत लाखो रुपयांच्या भ्रष्ठाचाराचे कुरण असलेल्या ग्रामपंचायत मध्ये विकास कमी उचल जास्त असल्याने याबाबतच्या तक्रारी येथील एका समाजसेवकाने लावून धरल्याने पं. स. अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत आर्थिक व्यवहाराचे व ईतर अनुषंगीक दस्तऐवजाची तपासणी अहवाल तयार करण्यात आला.तो वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला असून ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास येत्या 24 जानेवारीला आमरण उपोषणाचा मंडप ठोकू असा गर्भीत ईशारा देण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment