– राजु उंबरकर यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला आशावाद
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
खरंतर आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले काम पाहता या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित असल्याची खात्री होती. मात्र, मतदारांनी यासर्व कामाला आणि पक्षाला नाकारले आणि मला पराभवाला सामोरे जावे लागले. माझा पराभव झाला यापेक्षा मोठ दु:ख मतदारांनी एका कामाच्या माणसाला सत्तेपासून दूर ठेवल. जर असे झाले नसते तर येत्या काळात मतदारसंघाचा कायापालट आणि विकासात्मक बाबीने चित्र वेगळे असते. असा आशावाद मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी वणी येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला.
जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णतः मान्य करून या मताचा आदर करतो. मला निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे, माझ्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे, महाराष्ट्र सैनिकांचे, इतर राजकीय पक्षातील, सामाजिक संघटनातील प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी – कार्यकर्त्यांचे आभार मानले.
या निवडणुकीत माझा झालेला पराभव हा मला संपविणारा नाही. कारण आजवरच्या माझ्या इतिहासात अनेकदा मला पराभवाला सामोरे जावे लागले. यासर्व पराभवा नंतर मी कधी खचलो नाही. रणांगण सोडून कधी दूर गेलो नाही. उलट पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो. कारण हा मतदारसंघ माझा परिवार आहे. येथील प्रत्येक जन माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. म्हणून गेली २० वर्ष मी येथील माता – भगिनी, युवक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, सर्वसामान्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढत आलो. त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी येथील व्यवस्थेशी भांडत आलो व व्यवस्थेविरोधात संघर्ष करीत राहील.
वेळप्रसंगी रस्त्यावर उतरलो, तुरुंगवास सुद्धा भोगला. आणि जनसेवेचा हा यज्ञकुंड अविरत चालू ठेवला. यासर्व गोष्टीचे आपण सर्व साक्षीदार आहात.
म्हणून याही पराभवा नंतर मी आणि माझा महाराष्ट्र सैनिक कुठेही न खचता कुठेही न थांबता पुन्हा जोमाने, ताकदीने जनतेसाठी सज्ज राहील. मी आमदार जरी झालो नाही तरी आमदाराच्या कर्तव्याच्या समोर जावून काम करेल अशी ग्वाही देतो.
येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर होणार. आजवर मतदार संघासाठी केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडत या निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे जाईल. येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीनिशी उभा राहून ह्या निवडणुका लढविणार आणि यश संपादन करणार.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजयभाऊ देरकर यांचा विजय झाला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यांच्या हातून वणी विधानसभा मतदारसंघाची विकासाची वाटचाल व्हावी आणि मतदारसंघ राज्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर व्हावा ही सदिच्छा या ठिकाणी आपल्या सर्वांचे साक्षीने व्यक्त करतो.
पत्रपरिषदेत यावेळी विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जय महाराष्ट्र…!