– वणीत राज ठाकरे यांचे प्रचारसभेत आवाहन
मारेगाव : दीपक डोहणे
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांचे जटील प्रश्न, आरोग्य, वीज, शुद्ध पाण्याचा प्रश्नासोबत रस्ते या मूलभूत गरजा मागील पंचेवीस वर्षांपासून आवासून उभ्या आहे याबाबत मन कासावीस होतेय. हे परिवर्तीत करण्यासाठी आता राजकीय बदल अनिवार्य आहे. राजु उंबरकर सारखा तळमळीचा नेता विधानसभेत पाठविण्याची गरज असून प्रस्थापितांना घरी बसवा व नवागतांना संधी देण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रिमो राज ठाकरे यांनी केले.
ते वणी येथे मंगळवार येथे मनसे उमेदवार राजु उंबरकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. मंचावर विदर्भातील मनसेचे सर्वच उमेदवार प्रामुख्याने हजर होते.
यावेळी ठाकरे बोलतांना युती सरकारचे वाभाडे काढत महाराष्ट्र जातीपातीत विभागला. शेतकरी आत्महत्या करीत आहे, बेरोजगारांचे लोंढे फुगत आहे. स्रियांवरील अत्याचारात वाढ चिंतेत भर टाकत आहे. तुमच्या भागातील मूलभूत गरजा वाटोळ्या झाल्यात. एवढं असतांना आता प्रस्थापित येतील पैसे देतील, तुमचं मत विकत घेतील,पर्यायाने तुम्हाला विकत घेतील.तुम्हाला पत्ताही लागणार नाही. वर्तमान स्थितीत ज्याला राग, चीड येत नाही. अशा स्वाभिमानीशून्य लोकांचे आपणास नेतृत्व करायचं नाही. अलीकडेच राजकारणाचा पूर्ण पोत बदलला आहे. मतदार म्हणून आपण कुठं आहोत याचा गांभीर्याने विचार करून राजु उंबरकर सारखा संवेदनशील उमेदवार विधानसभेत पाठवा व मतदारसंघाचा बदललेला चेहरामोहरा एकदा बघा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
याप्रसंगी प्रास्ताविक नगरसेवक सचिन भोयर तर हरीश कामारकर यांनी सूत्रसंचालन केले.