– चौरंगी लढतीचे चित्र
– विधानसभेच्या रणागंणात.. डझनभर उमेदवार
मारेगाव : दीपक डोहणे
वणी मतदारसंघात महाविकास आघाडीला बंडाखोरांची समजूत घालण्यात अपयश आल्यानंतर दोन पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचे जिल्हा सरचिटनीस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठींबा दिल्याने आघाडीचा उमेदवार एकाकी पडल्याचे चित्र आहे.परिणामी, महाविकास आघाडीतील ही दुफळी नेमकी कुणाच्या पथ्यावर पडेल हा येणारा काळ ठरविणार आहे.
सन 1962 पासून वणी मतदारसंघ काँग्रेस च्या ताब्यात असतांना यावेळी महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेचे संजय देरकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. काँग्रेस कडून माजी आमदार वामनराव कासावार, संजय खाडे हे प्रमुख स्पर्धक होते मात्र ही जागा उबाठा ला सुटल्याने काँग्रेस मध्ये कमालीची अस्वस्थता आहे. काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यांनी माघार घ्यावी म्हणून काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने खाडे यांनी उमेदवारी कायम ठेवत संजय देरकर यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे.
खाडे यांनी काँग्रेसचे अस्तित्व कायम राहण्यासाठीच आपली उमेदवारी असल्याचे पत्रपरिषदेत जाहिर केले. त्यांच्या दिमतीला शिवसेना व काँग्रेस मधील दोन मोठे गट असल्याने आता ही लढाई अस्तित्वावर येवून ठेपली आहे. खाडे यांच्या उमेदवारीने मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे.
विधानसभा रणागंणात..डझनभर उमेदवार रिंगणात…!
वणी विधानसभा मतदार संघात एकूण 12 उमेदवार आपले नशिब आजमावित आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजु उंबरकर, भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेना (उबाठा )चे संजय देरकर, अपक्ष संजय खाडे, भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे अनील हेपट, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र निमसटकर, बहुजन समाज पार्टीचे अरुणकुमार खैरे, अपक्ष हरीश पाते, अपक्ष केतन पारखी, अपक्ष नारायण गोडे, अपक्ष निखिल ढुरके, अपक्ष राहुल आत्राम यांचा समावेश आहे.