– एकदिलाने काम करून निवडून आणण्याचा विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे यांचा पत्रपरिषदेत एल्गार
– संजय खाडे यांचे बोधचिन्ह “शिट्टी”
मारेगाव : दीपक डोहणे
मागील पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षाची मोट बांधून सर्वसामान्य जनतेला जनहित केंद्राच्या माध्यमातून चळवळ राबविली. मात्र काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला. किंबहुना आता जनसेवेसाठी व हजारो कार्यकर्त्यांचा सोज्वळ सल्ला आणि आग्रहास्तव माझी उमेदवारी अपक्ष म्हणून रणागंणात कायम असल्याची घोषणा अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी केली.खाडे यांच्या भूमिकेने महाविकास आघाडीत बिघाडीची संभाव्य शक्यता निर्माण होण्याचे संकेत आहे.दरम्यान, शिट्टी या बोधचिन्हावर बटण दाबून मला विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
वणी येथील वसंत जिनिंग सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेत माजी आमदार तथा उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, सभापती गौरीशंकर खुराणा, सुनील वरारकर, पुरोषत्तम आवारी, प्रशांत गोहोकार, तेजराज बोढे, शंकर वऱ्हाटे, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे, मारेगाव बाजार समितीचे संचालक विलास वासाडे, यादवराव काळे, तुळशीराम कुमरे, यांचेसह बहुसंख्य काँग्रेस व शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी खाडे यांनी आपण पक्षाचे तळमळीने कार्य करीत संघटन मजबूत केले. मात्र, काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला हा बालेकिल्ला ढासळू नये म्हणून मी विधानसभाच्या रणागंणात ताकदीने उतरलो आहे.
मीच पक्षाची मोट बांधली: माजी आमदार विश्वास नांदेकर
या मतदारसंघात गत तीस वर्षांपासून शिवसेनेचा डोलारा सांभाळला. कार्यकर्त्यांची खुली चर्चा करीत पक्षाची मोट बांधली. अप्रामाणिक नेतृत्वाकडे उमेदवारी बहाल झाल्याची खंत व्यक्त करीत मतदारसंघातील शिवसैनिकांनी संजय खाडे यांचा विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
पंजा गायब झाल्याची सल : नरेंद्र ठाकरे
परंपरागत काँग्रेस मतदारसंघ संघात ऐनवेळी कलाटणी मिळाली.काँग्रेसचा पंजा या मतदारसंघातून बेपत्ता होणे ही सल मनात रुचत आहे. मात्र, खाडे यांचेसमवेत काँग्रेस विचारी कार्यकर्ता व मतदार सक्रीय आहे. निश्चितच मतदार राजा हा निष्क्रिय व सक्रीय उमेदवारांचा गांभीर्याने विचार करेल. तशा आशयाची ताकद आम्ही निष्ठावान म्हणून लावू असा आशावाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे यांनी व्यक्त केला.