वेदनादायी..चिंचमंडळच्या अल्पभूधारक शेतकऱ्यावर तिहेरी संकटाचा फास

– अख्खी शेती खरडली, पत्नीची कर्करोगाशी झुंज अन पशुधनाचा सर्पदंशाने मृत्यू

मारेगाव : दीपक डोहणे

चौकोनी कुटुंबात घरात अठराविश्व दारिद्र्य.सर्वांच्या कपाळावर संकटाच्या समस्या चिकटलेल्या.तरीही काबडकष्ठ करून जगण्याचा संघर्ष अविरत.नियत एवढ्यावर थांबत नाही तर एकमागावून एक संकटाची मालिका सुरु आहे.मायबाप सरकार च्या परिपत्रकात मदतीचा शब्द नसल्याने हे निरागस चेहरे आवासून शून्याकडे बघत जगण्याचे बळ शोधते आहे.

मारोती नामदेव सातपुते असं आभाळ कोसळावं अशा संकटाच्या चक्रव्यूव्हात सापडलेल्या शेतकऱ्यांचं नाव. वडिलोपार्जित केवळ अडीच एकर शेती. सोबतीला ठेका पद्धतीने काही एकर करीत जगण्याचा आधार असतो. मात्र दरवर्षीचा पावसाळ्यातील पूर अख्खी शेती खरडून नेते असंच संकट यंदाही त्यांच्या वाट्याला. मारोती, पत्नी लता व दोन मुले. एक मुलगा शिक्षण घेतोय तर दुसरा वडीलासोबत शेतीत राबतो. मागील दोन वर्षांपासून कर्करोगाशी दोन हात करीत लताबाई जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. यंदाच्या शेती उत्पादनात प्रचंड घट डोळ्यासमोर असतांना चिंतेचे सावट या कुटुंबाच्या सभोवताल घिरट्या घालत आहे.संकटाचा हा भोवरा इथेच थांबला नाही तर काल परवा बैलजोडीतील एका बैलास सर्पदंश होत मृत्यूमुखी पडला. या पशुधनाची किंमत 90 हजार रुपयाच्या घरात असल्याचे पिडीत शेतकऱ्याकडून सांगण्यात आले. याची तोडकी मदत तरी मिळेल या भाबड्या आशेने सर्वच प्रशासनाचे दरवाजे ठोठावले मात्र मदतीसाठी शासनाचे परिपत्रकच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याने गावाकडील वाट धरली.

एका बैलाने कशी शेती करायची.दुसरा बैल घेण्याची कुवत नाही.नैसर्गिक संकटाने शेती खरडून नेली. आगामी दिवसात जगण्याचा प्रश्न. पत्नीच्या आजारासाठी पैसा नाही.मुलाच्या शिक्षणासाठी कशी मदत करावी अशा विविधांगी प्रश्नाने हा पिडीत शेतकरी संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शासनाकडे पशुधन सर्पदंश मदतीची कोणतीही योजना नसल्याने हा शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे.

एखाद्याच्या मागे संकटाची मालिका कशी घुमत असतात याचे तंतोतंत उदाहरण मारोती सातपुते च्या रूपात दिसते आहे. जगण्याचं बळ शोधतांना संकटावर मात करण्याचा संघर्ष अविरत आहे.या वेदनादायी प्रसंगात पाठबळ मिळविण्यासाठी आता तो शासनाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment