– गाव एकवटला : पोलिसात गुन्हा दाखल
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
गोठ्यात पशुधन बांधण्यास गेलेल्या महिलेस अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाने मारहाण केल्याने ग्रामस्थात कमालीचा संताप व्यक्त होत आहे. परिणामी, ग्रामस्थांनी पोलिसात धाव घेत तक्रार करताच विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुसरी येथे गावकऱ्यांचा प्रचंड विरोध झूगारत मुजोरीने अवैध दारू विक्री जोमात आहे.तुळशीराम कवडू गजबे हा खरा अवैध दारू विक्रीचा खरा खलनायक असून त्याचे संदर्भात वारंवार गावकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यानंतरही मुजोरीने दारू विक्री सुरु आहे. त्यामुळे येथील सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड बाधा पोहचत आहे. किंबहुना अनेक युवक व्यसनाधीन होत कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होत आहे.
गावातील प्रामुख्याने महिलांच्या वारंवार तक्रारी जिव्हारी लागल्याने एक महिला गोठ्यात पशुधन बांधण्यास आली असता तुळशीराम गजबे याने मारहाण केली.
या संतापजनक घटनेची आपबिती कथन करण्यासाठी शेकडो महिला पुरुष मंगळवारला रात्री पोलिसात सरसावल्या.त्यानुसार संशायित आरोपी तुळशीराम गजबे (30)रा. सुसरी याचे विरोधात पोलिसात तक्रार दाखल करून कलम 296 , 115 (2), 351 (2) (3) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांचे कायमस्वरूपी मुसके आवळण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.