पोळा साजरा… मारेगाव तालुक्यात बैलाप्रती बळीराजाची कृतज्ञता

 

– खोके रे खोके.. महाराष्ट्रात बसले तीन बोके..? झडत्यांनी आणली रंगत 

– ग्रामीण भागात प्रचंड माहोल 

मारेगाव : दीपक डोहणे 

मारेगाव शहरासह ग्रामीण भागात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऊन पाऊस थंडीत वर्षभर साथसंगत देणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा.मारेगाव येथे सोमवारला दुतर्फा मार्डी रोडने बैलजोड्या रंगीबेरंगी साज करून दिमाखात उभ्या ठाकल्या. भजन मंडळाचा सुमधुर सूर व झडत्यांच्या सुरांनी अवघा परिसर दणाणला. तोरण तुटले अन बैल सालदार व मालकासह घराकडे सरसावले. बैलाप्रती समर्पित आणि कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण मोठ्या उत्सवात साजरा झाला.

अवघ्या महाराष्ट्रात बैलाची कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पोळा या एक दिवसाला वर्षभर साथ देणाऱ्या बैला कडून कोणतेच काम केल्या जात नाही. सकाळी त्यांचे स्नान अन सायंकाळच्या सुमारास त्यांना वेगवेगळ्या रंगाची झूल पांघरून साज करण्यात येते.शहरात व ग्रामीण भागातील परंपरागत दुतर्फा स्थळी ऐटीत उभे करण्यात आल्यागत गावपातळीवरील कीर्तन भजन मंडळ आपल्या सुरमधुर आवाजाने फेरी काढण्यात आली.

यातच वर्तमान राजकीय वास्तवतेवर कानपिचक्या देणाऱ्या झडत्या उमटल्या. मारेगावात ‘खोके रे खोके, पन्नास खोके.. महाराष्ट्रात बसले तीन बोके’..! “गद्दारांना भेटले पन्नास खोके… अन म्हणतात शेतकरी ओके..”, ” आधीच्या सरकारला दिला ईडी मार्फत घाव..बंडाखोरांना 50 खोकेंचा भाव “…, ” खुर्चीसाठी करता काय काय.. शेतकऱ्यांच्या मालाला तोडका भाव.. “एक मनगडा पार्बती हरबरा हरण महादेव..! बैलपोळा निमित्ताने झडत्यातून चिमटे काढण्यात आले.मार्डीरोड च्या मध्यभागी बांधलेले तोरण तुटताच बैल घराकडे सरसावत त्यांची औक्षण व पायपुजा करून गोडघासाचा नवैध भरविण्यात आला.

पिसगावात सर्जाराजा च्या जोडीने लक्ष वेधले

  तालुक्यातील पिसगाव येथे बैल पोळा सण साजरा करण्यात आला. बैलाची उभ्या रांगेतील आकर्षक सजावट. गावात वेगळाच माहोल करून गेला.येथील शेतकरी मारोती गौरकार यांच्या बैलजोडीचा साज बघणाऱ्याच्या डोळ्यातील पारणे फेडत होती. सर्जा राजाच्या जोडीच्या पाठीवर रंगरंगोटी, नक्षीकाम, गळ्यात घुंगराच्या माळा, रंगीबेरंगी झूल, नवी वेसण, कासरा, पायात तोडे व शिंगावरील मकराच्या सजावटीने बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधत होती.किंबहुना ही बैलजोडी आकर्षक ठरली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment