– मारेगाव येथील घटनेने खळबळ
– टाकरखेडा येथील नविन बामणे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव कान्हाळगाव रस्त्यालगत सोशल क्लबवर व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या विवाहित युवकाने तिसऱ्या मजल्यावर पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना आज रविवारी दुपारी 2 वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
नविन मोतीगिरी बामणे (40) रा. टाकरखेडा ता. मारेगाव असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
मारेगाव स्थित मागील अनेक वर्षांपासून सरकार मान्य उभार वेलफेअर असोसिएशन क्रीडा मंडळ नावाने तीन मजली इमारतीत टोकन सिस्टीम ने क्लब चालतो.चोवीस तास चालणाऱ्या या व्यवसायात दूरवरील ग्राहकांची वर्दळ असते.
येथे मागील महिन्याभरापासून व्यवस्थापक म्हणून नविन बामने हा कार्यरत होता.त्याने थेट तिसऱ्या मजल्यावर जात पंख्याच्या सहाय्याला दोरी बांधून गळफास घेतला. मॅनेजर अजून आला नसल्याने एका कर्मचाऱ्याने तिसऱ्या मजल्यावर बघितले असता गळफास लावून नविन हा मृतावस्थेत निदर्शनास आला.या घटनेने पुरती खळबळ उडाली असून घटना स्थळी बघणाऱ्यांची रिघ लागली आहे. तूर्तास आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.मृतकाच्या पश्चात पत्नी, तीन वर्षीय मुलगी, आई असा परिवार आहे.
वाढदिवसाच्या दिनी आत्महत्या
नविन बामने याचा आज रविवार ला वाढदिवस आहे.मागील अनेक वर्षांपासून तो नागपूर येथे कुटुंबासह राहत होता. अल्पशा मिळकतीने कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्याने नागपूर सोडून पंधरा दिवसापूर्वी मारेगाव येथे आला. येथील सोशल क्लब वर मॅनेजर म्हणून कार्यरत होता. आज जन्मदिनी मित्रांचे अन आप्तेष्टीतांचे दीर्घ आयुष्यासाठी सकाळ पासून फोन खणखणत असतांना जन्मदिनीच नविन ने मृत्यूला कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.