– शुक्रवारला वर्धा नदीत घेतली होती उडी
– माजरी जवळ गाळात फसला होता मृतदेह : आज मारेगावात अंत्यसंस्कार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील युवतीने मागील शुक्रवारी पाटाळा वर्धा नदीत उडी घेत आत्महत्या केली.प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबविल्यानंतर माजरी नजीक नदीतील गाळात अडकलेला माधुरीचा मृतदेह मंगळवारला सायंकाळच्या सुमारास आढळून आला. परिणामी, माधुरीच्या टोकाच्या पावलाने हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे राजूर कॉलरी येथील वडील नोकरी निमित्त मारेगाव येथील घरकुल कॉलनी वास्तव्यात होते.वडील अरुण व आई उषा खैरे हे दोघेही जिल्हा परिषद शिक्षक होते.दहावर्षांपूर्वी वडिलांचे तर चार महिण्यापूर्वी आईचे निधन झाले होते.
थोरला भाऊ यश व बहीण माधुरी दोघेच घरी असतांना माधुरीने मागील शुक्रवारी पाटाळा वर्धा नदीत उडी घेत जीवनयात्रा संपविली.पुलावर मोबाईल, पर्स व चप्पल आढळल्याने खळबळ उडाली होती, दरम्यान नातेवाईकांनी सिसिटीव्ही फुटेज तपासले असता माधुरी तुडुंब भरलेल्या नदीत उडी घेतांना निदर्शनास आल्याने नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली.
वणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन,आपत्ती व्यवस्थापन पथक व नातेवाईकांनी दूरवर शोधमोहीम राबविली. मात्र काही अंतरावर असलेल्या माजरी जवळील नदीत गाळात फसून असलेला माधुरीचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनी मंगळवारला सायंकाळ च्या सुमारास हाती लागला.मृतदेह उत्तरीय तपासणी साठी वरोरा येथे हलविण्यात आला असून आज बुधवारला सकाळी 11 वाजता मारेगाव स्थित अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली.
माधुरी अरुण खैरे (28) हिने आत्महत्या का केली याबाबत सर्वच अनभिज्ञ आहे. मात्र कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने पंचक्रोशी हादरली असून एकुलता एक यश याच्यावर तूर्तास एकांताचे जीने वाट्याला आले आहे.