– आशिष खूलसंगे यांचा पत्र परिषदेत घणघात
– शेतकरी न्याय यात्रेत भूमिका विषद करणार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
सरकारचे शेतकरी विरोधी चुकीचे धोरण आणि बेताल पद्धतीच्या संगमाने कृषी प्रधान देशाचा पोशिंदा पुरता मेटाकुटीस आला आहे. सातत्याने होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हे त्याचेच परिपाक आहे. बळीराजाच्या या आर्थिक शोषणाला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. यामुळेच अबकी बार चार सौ पार वाली घोषणा देणारे मोदी सरकार ला यावेळी चांगलाच झटका बसला. याच मुजोरीने महाराष्ट्रात फोडाफोडी चे राजकारण करून सुसंस्कृत राज्याचा सत्यानाश करणे सुरू केले आहे. या जुलमी सरकारचे वाभाडे काढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठीची भुमिका आपण शेतकरी न्याय यात्रेतून मांडू असा घणाघात झरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा वसंत जिनिंग अँड प्रेसिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी मारेगाव येथे दि.4 आँगस्टला पत्रकार परिषदेत केला.
केंद्र सरकारचे कृषी धोरण आणि त्याचा अंमल करणारे राज्य सरकारने येथील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. एकही हिताचा निर्णय घेत नसल्याने शेतकरी पूर्णतः मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्याच्या सभोवताल विविध समस्या घिरट्या घालत आहे. या जोखडातून बाहेर निघण्यासाठी व उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारस कडे हे सरकार जाणीवपूर्वक कायम दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत असल्याची खंत यावेळी खुलसंगे यांनी व्यक्त केली.
या पत्र परिषदेत सडेतोड उत्तरे देतांना खुलसंगे यांनी वणी विधानसभा मतदार संघाचा परामर्श घेत समस्यांचा पाढाच वाचला. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवकांचे प्रश्न, खनिज आणि वन संपत्तीचा प्रश्न या प्रस्थापित सरकारच्या व लोकप्रतिनिधीच्या काळात अधिक गडद झाला. येथील शेतकरी व जनता यामुळे पुरते नागविले जात आहे. यावर विकासात्मक दृष्टीने पाहण्यासाठी आणि बळीराजासह बेरोजगारीवर मात करण्यासाठी व न्याय हक्क पदरी पाडण्यासाठी या शेतकरी न्याय यात्रा लढ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आशिष खुलसंगे यांनी केले.यावेळी त्यांनी शेतकरी तथा बेरोजगारीवर चिंता व्यक्त करीत व त्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या मुजोर सरकार विरोधात आवाज उठविणे आवश्यक असल्याचे सांगितले. आगामी काळात हे सरकार व लोकप्रतिनिधी यांना उलथवून टाकण्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन आशिष खूलसंगे यांनी केले.
पत्रपरिषदेत मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार सह वणी, झरी जामणी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.