– दापोरा – चिंचमंडळ शिवारातील वास्तव
– शेतकरी आर्थिक मेटाकुटीस : विवंचना वाढली
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यात संततधार सुरु असतांना दापोरा व चिंचमंडळ शिवारातील किमान शंभर हेक्टर शेत जमिनीतील उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची विवंचना वाढून चिंतेचे सावट पसरले आहे.
मागील तीन दिवसापासून नियमित सुरु असलेल्या पावसाने सदरील परिसरातील कपाशी, सोयाबीन व तूर पिके पाण्याखाली गेली आहे.यात नदी व नालाशेजारील भागाचा समावेश आहे.
दरवर्षाला ही समस्या येथील शेतकऱ्यांच्या नशिबी चिकटली असतांना शासन – प्रशासना करवी ठोस उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याने याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. मागील दोन वर्षांपूर्वी तत्कालीन कृषी राज्यमंत्री अजित पवार यांचा दापोरा दौरा केवळ औटघटकेचा ठरला होता. मंत्री आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र मंत्र्यांची आश्वासने हवेत विरत हा मंत्री महोदयांचा दौरा वांझोटा ठरला.
दरम्यान, स्थानिक पातळीवरील पुढारी फोटोसेशनसाठीची धन्यता मानत तोडक्या मदतीचा बागुलबुवा करीत असल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजीचा सूर आहे. या परिसरात उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होवून उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात असून तूर्तास 100 हेक्टर उभ्या पिकाची शेत जमीन पाण्याखाली असल्याने या नुकसानीने शेतकरी आर्थिक मेटकुटीस येवून शेतकऱ्यात चिंतेचे सावट पसरले आहे.
ठोस उपाययोजनेची गरज
दरवर्षाला होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला येथील व्यवस्था जबाबदार असून येथील लोकप्रतिनिधी व पुढारी भेट देत केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटण्याचा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न चालविला जात असून दरवर्षाला पाण्याखाली जाणाऱ्या उभ्या पिकांवर ठोस उपाययोजना मायबाप सरकारने करावी व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.
दिवाकर सातपुते
माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते, चिंचमंडळ