– घोडदरा रस्त्याने अपघाताची शक्यता बळावली
– रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य : दयाल रोगे व गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
राज्य महामार्गावरील खडकी वरून घोडदरा जाणाऱ्या पुलाच्या मधोमध भोक पडल्याने व डांबरीकरणाचे अर्धवट काम केल्याने रस्त्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह येजा करणाऱ्या नागरिकांवर अपघाताची शक्यता बळावल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट आहे. यावर तात्काळ पर्याय काढा अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
मारेगाव वरून पश्चिम दिशेला खडकी फाट्यावरून घोडदरा हे दीड हजार लोकवस्तीच गाव वसलेलं आहे. मागील वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत अडीच किमी. अंतराच्या रस्त्याच्या कामात केवळ 600 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. उर्वरित काम 100 मीटर खडीकरण करून मातीचा भरणा करण्यात आल्याने ऐन पावसाळ्यात हा सोडलेला अर्धवट रस्ता चिखलमय झाला आहे. याच रस्त्याने पुलाच्या मधोमध भोक पडल्याने पावसात हा खड्डा पाणी साचल्याने दिसेनासा होत असल्याने अपघाताची संभाव्य शक्यता निर्माण झाली असून रहदारी करणाऱ्यात भितीचे सावट निर्माण झाले आहे.
परिणामी, तूर्तास पावसाळ्यास प्रारंभ झाल्याने रस्त्याने जागोजागी पाण्याचे डबके साचले आहे. घोडदरा गावातील किमान 200 विद्यार्थी ऑटोरीक्षा सह सायकल ने विद्यार्जनाचे कार्य करीत असल्याने या रस्त्याने मोठा धोका निर्माण होवून पालकांची चिंता वाढविली आहे.
होणाऱ्या संभाव्य घटनेपूर्वी संबंधित विभागाने तात्काळ तजवीज करून रस्त्याची दुरुस्ती करावी व थातुरमातुर काम करणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा येत्या चार दिवसात आंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दयाल रोगे सह गावकऱ्यांनी दिला आहे.