– व्यसनाधीनचा आलेख वाढला : बार संचालकाकडून नियमांचे उल्लंघन
– ए.आय.एस.एफ.मार्फत वरिष्ठाकडे तक्रार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव हायवेला डझनभर असलेल्या बियरबार मध्ये सर्वच नियम धाब्यावर ठेवून भल्या पहाटेपासून खुलेआम विदेशी दारूची विक्री होत आहे. सकाळपासून युवकांसह व्यसनाधीनांची झुबंड असणाऱ्या या व्यसनाने कुटुंबात कलहाचे वातावरण आहे.मात्र बार मालकांच्या ‘पहाटेच्या ड्युटीने’ अबकारी विभागाला चपराक बसत असल्याने या बाबतची तक्रार मारेगाव तालुका ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने तक्रार वरिष्ठाना दिली आहे.
मारेगाव शहरांत उद्योग धंद्याला भोपळा असून विदेशी दारू विक्री ची दुकाने डझनभर आहे.हायवेला असलेल्या काही निवडक बार हे नियमावलीला बगल देत भल्या पहाटे पासून दारूची विक्री सर्रासपणे करीत असल्याचा आरोप ए. आय. एस. एफ. ने केला आहे.
भल्या पहाटे पासून सुरु असणाऱ्या विदेशी दारू विक्रीने आंबट शौकीनांची रिघ लागलेली असते. येथे नियम व अटीला पूर्णतः बगल देत संबंधित विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत आहे. त्यामुळे अनेक युवक व्यसनधिनच्या गटारगंगेत न्हावून निघत आहे. या व्यसनाने अनेकांच्या कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होत असून सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड धोका निर्माण होत आहे. सकाळपासूनच्या मदिरा व्यसनाने मारेगाव येथील जवळपास चार युवकांचा मृत्यूही झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
परिणामी, सकाळ पासूनच्या मदिरा विक्रीवर अंकुश लावावा अन्यथा ए. आय. एस. एफ. कडून आंदोलन छेडण्याचा ईशारा तालुका सचिव प्रफुल्ल आदे यांचेसह पदाधिकारी यांनी स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनातून दिला आहे.