– बांधकाम विभागाकडून नोटीसा : लघू व्यवसाय धारकांचे स्थगिती साठी तहसीलदारकडे साकडे
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
शहरातील वाहतूक कोंडीला सैल करण्यासाठी दुतर्फा अतिक्रमण काढण्याच्या हालचालीला वेग आला असून त्या संदर्भातील लघू व्यवसायक धारकांना नोटीसा बाजाविण्यात आल्याने व्यवसाय धारकात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. परिणामी,अतिक्रमण हटविण्यास स्थगिती देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसील प्रशासनास देण्यात आले.
अनेकांचे कुटुंब चालणाऱ्या दुतर्फा रस्त्यावर छोटे मोठे व्यवसाय सुरु आहे. सर्व सामान्य युवकांचे व्यवसाय असलेले या व्यवसाय धारकात पदवीधर बेरोजगार युवकांचा मोठा समावेश आहे. यात पान टपरी, चहा, मोबाईल दुरुस्ती, फळ, जनरल, भाजीपाला दुकानाचा समावेश आहे.
परिणामी, या व्यवसायात अनेकांना कुटुंब चालविण्याचा आधार अवगत झाला असून मारेगाव तालुका उद्योग धंद्यासाठी वांझोटा असतांना बेरोजगारांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे. अशातच अनेकांचे हात रिकामे असतांना छोटेमोठे व्यवसाय करीत कुटुंब चालवित असतांना बांधकाम विभागाची आता करडी नजर पडली आहे.
करंजी, मारेगाव, वणी,घुगुस व पडोली प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 14 मारेगाव येथील अतिक्रमण हटविण्यासाठी रस्त्याच्या मध्यापासून 15.00 मीटर तात्काळ काढण्यासाठी अतिक्रमण धारकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. अवघ्या तीन दिवसाची मुदत दिलेल्या व्यवसाय धारक कमालीचे चक्रावत तहसील प्रशासनास स्थगिती मिळविण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे.
अतिक्रमणावर हातोडा बसणार की ही कारवाई सैल होणार याकडे फुटफाथ धारकांचे लक्ष लागले आहे.