– विना नंबरचे दोन ट्रॅक्टरवर मारेगाव महसूल विभागाची कारवाई
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील दांडगाव, आपटी, सावंगी व कोसारा वर्धा नदीपात्रातील रेती घाटाचा लीलाव करण्यात आला होता. सदर घाटातील रेती साठा करून 24 जून पर्यंत बुकींग परवानगी होती.मात्र वाहतूक पास नावाखाली तस्करांनी फंडा वापरत ही वाळू चोरून नेत असतांना महसूल विभागाने छापा टाकत दोन वाळू भरलेले ट्रॅक्टर जप्त केल्याची कारवाई आज बुधवारला सकाळी केली.
मारेगांव तालुक्यात चालू वर्षी मौजे सावंगी, कोसारा आणि दांडगाव आपटी येथील वर्धा नदीच्या पात्रातील रेतीघाटाचा लिलाव करण्यात आलेला होता. शासनाने दिनांक 24 जून 2024 पर्यंत डेपो मध्ये साठवून बुकींग केलेली रेती वाहतूक करण्याची परवानगी दिलेली होती. त्यानंतर दिनांक 25/6/2024 रोजी डेपो मधील शिल्लक रेती महसूल प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहे. वाहतूक पास च्या नावाखाली कांही ट्रॅक्टर धारक एखादी ट्रिप चोरून मारीत आहेत असे लक्षात आल्यामुळे आज दिनांक 26 जून 2024 रोजी रोजी सकाळी ठीक 6-00 वाजता मोजे सावंगी तालुका मारेगांव शिवारातील कोसारा-सावंगी या मुख्य रस्त्यावर दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे. यात ट्रॅक्टर क्रमांक MH-BE 2966 व दुसरे विना क्रमांकाचे होते. सदरची कार्यवाही मा. उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार उत्तम निलावाड, अरुण भगत नायब तहसीलदार, अमोल गुघाणे मंडळ अधिकारी, तलाठी विवेश सोयाम, शेखर शिंगणे, गजानन वानखेडे, विकास मडावी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
सदरची रेती बोरी ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील वर्धा नदीच्या पात्रातील असल्याचे वाहन चालक यांनी सांगितले.दरम्यान, वाळू तस्कर चोरटे या विभागात सक्रीय असून महसूल विभागाच्या वारंवार कारवाईच्या लगामीने अनेक तस्करांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.