– लोकसभा निकालाने ब्लडप्रेशर वाढले
– अनेक दिग्गजांनी बाशिंग बांधले
मारेगाव : दीपक डोहणे
लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचा अभूतपूर्व मतांनी झालेला विजय विरोधकांचे ब्लडप्रेशर वाढविण्यास पुरेशे ठरत असतांना आगामी विधानसभा निवडणुकीत युती कायम राहिल्यास महाविकास आघाडीचा वरचष्मा राहण्याचे संकेत आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार मतांनी दारुण पराभव करीत एकतर्फीसदृश्य निवडणूक जिंकली. महाराष्ट्र राजकारणात झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या बागुलबुवात कुणाला कशी चपराक बसली हे कुण्या ज्योतिष्याला विचारण्याची गरज उरली नाही. किंबहुना हे राजकारण अनेकांच्या पचणी पडले नसल्याने मतदारांनी जोर काय झटका धीरेसे मारला.
धानोरकर यांच्या विक्रमी विजयाने काँग्रेस मध्ये नवचैतन्याची उभारी आली आहे. धानोरकर यांच्या कडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा मतदार ठेवून असतांना या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी घ्यावी एवढी माफक अपेक्षा मतदारांकरवी आहे.
अवघ्या चार महिण्यावर विधानसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा लोकसभेसारखा फार्मुला विधानसभेत युतीचा धर्म पाळला तर डीएमके मतदारांवर वणी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अशक्य नाही. यासाठीची चाचपणी व व्यूव्हरचना आखण्यात येत आहे.महायुतीकडूनही सर्वे सुरु असल्याने आगामी निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वणी विधानसभा निवडणुकीकरिता डझनभर उमेदवारांनी आत्तापासून बाशिंग बांधले आहे. अनेकांनी पायाला भिंगरी बांधून विधानसभा क्षेत्र पिंजून काढण्यावर भर देणे सुरु केले आहे.आघाडी व महायुती कशी असेल यावर संभाव्य उमेदवारांचे भवितव्य लोकशाहीचा राजा यांच्या हातात असेल. तूर्तास लोकसभेच्या अभूतपूर्व निकालाने अनेकांचे ब्लडप्रेशर वाढल्याने त्यावर कसा उपचार करावा यासाठी प्रमुख पक्ष चाचपणी करीत आहे.