सुलतानी संकटाच्या वेदना सहन करणार नाही

 

-मारेगाव पत्रपरिषदेत राजू उंबरकर यांचा गर्भीत ईशारा

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

कृषी प्रधान देशाचा पोशिंदा वेगवेगळ्या संकटाचा सामना करीत नागवीला जात आहे. भरीस भर म्हणून प्रशासन व वीज कंपनीच्या बेताल भूमिकेने संकट शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनतो आहे. आता हे संकट सैल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावत प्रशासनास चपराक मारेल किंबहुना शेतकऱ्यांच्या असह्य वेदना मनसे सहन करणार नाही असा गर्भीत ईशारा मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पत्रपरिषदेत दिला.

 

मारेगाव येथील विश्राम गृहात आयोजित पत्रपरिषदेत तालुक्यातील विविध समस्याचा पाढा आणि परामर्ष घेत उंबरकर यांनी प्रस्थापित व विद्यमान लोकप्रतिनिधिवर ताशेरे ओढत आगामी काळातील मनसेची भूमिका विषद केली.

 

तालुक्यातील शेतकऱ्यांसह बेरोजगारी, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम तहसील , कृषी विभाग, वनविभाग तथा वीज कंपनीकडून होत आहे. तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर असतांना वाकलेले खांब,लोंबकळत असलेले तार, रोहित्र सारख्या कामाला कंपनीने बगल दिल्याने शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला पर्यायाने दुबार पेरणीचे संकट आणि नियमित वीज पुरवठाच्या समस्या उभ्या ठाकल्या आहे.

 

तालुक्यातील शेत रस्त्याच्या समस्या उजागर करण्यास प्रशासन सपशेल अनुत्तीर्ण झाले आहे. मातोश्री पांदण रस्ता ही महत्वाकांशी योजनेला पूर्णतः हडताळ फासला जातो आहे.त्यामुळे रस्त्याच्या समस्या प्रशासनाच्या दारीं आवासून उभ्या आहेत.लोकप्रतिनिधीचे उदासीन धोरण येथे कारणीभूत ठरत असल्याचा आरोप यावेळी उंबरकर यांनी केला.

 

तूर्तास रासायनिक खते, बी बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. केंद्र संचालक विद्राव्य खते व इतर खते घेतल्याशिवाय बियाणे रासायनिक खते देण्यास मज्जाव करतात हे वास्तव मांडतांना कृषी केंद्र संचालक व कृषी अधिकारी यांच्या समन्वयक आशीर्वादाने पिल्लू नावाची योजना आखून शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविल्या जात असल्याचा आरोपही उंबरकर यांचेकडून करण्यात आला. या सर्व शेतकऱ्यांच्या सुलतानी वेदना आता मनसे सहन करणार नाही. मनसे अवघ्या दिवसात स्टिंग ऑपरेशन राबवून प्रशासनाचा खरा मुकुट जनतेसमोर आणण्याचा ईशारा देण्यात आला.

 

पत्रपरिषद प्रसंगी राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर सह जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, महिला तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, शेख नबी आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment