वाळूचा जप्ती ट्रक चोरीला जातो तेव्हा…!

 

– तहसील कार्यालयाच्या समोरील घटनेने खळबळ 

– मारेगाव पोलिसात तक्रार : गुन्हा दाखल 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

अवैध वाळू चोरणारा ट्रक तहसील प्रशासनाने जप्ती केल्यानंतर मागील तीन दिवसाच्या सुट्ट्याचा फायदा घेत तहसील समोरील प्रांगणात उभा ट्रक चक्क चोरीला गेल्याची तक्रार तहसील प्रशासनाने पोलिसात केल्याने पुरती खळबळ उडाली आहे.

 

मागील फेब्रुवारी महिन्यात अवैध वाळू उत्खनन करून रेती भरलेला ट्रक क्रमांक एम. एच.36 – 1675 या वाहनावर तालुक्यातील महादापेठ येथे रात्री छापा टाकून महसूल विभागाने सदरील वाहनातील वाळू तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंती शेजारी खाली करीत तहसील प्रांगणात ट्रक जप्त करून लावण्यात आला होता.प्रशासनाचे कागदोपत्री सर्वंकष सोपस्कार पार पाडीत संबंधित ट्रक मालकास कळविण्यात आले होते. मात्र जप्तीच्या जाचक अटीने व भरणा करणाऱ्या लाखो रुपयांच्या रकमेने मागील चार महिन्यापासून जप्ती ट्रक तहसील समोर उभ्या अवस्थेत होता.

 

दरम्यान, दि.15 ते 17 जून या तीन दिवसाच्या कालावधीत शासकीय सुट्ट्याचा फायदा घेत अज्ञाताने हा ट्रक तहसील कार्यालयाच्या समोरून चोरून नेल्याची तक्रार महसूल विभागाने पोलिसात केली आहे. सदर चोरीला गेलेला ट्रक नऊ लाख रु. किमतीचा असून सतीश सुरूळकर रा. खापा (नागपूर )यांच्या मालकीचा असल्याचे कळते.

 

जप्त केलेला ट्रक चक्क तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून चोरीला गेल्याने महसूल प्रशासनाची पुरती भंबेरी उडून खळबळ उडाली आहे.परिणामी मारेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे चौफेर फिरविली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment