– मारेगावात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होते. शांतप्रिय बुद्ध यांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्ठिकोन हा प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. त्यांचे तत्वज्ञान जगण्यासाठी प्रेरित करणारे आहे.बुद्धाच्या शांतीचा संदेश या शब्दाचे अवलोकन करून भयाने व्याप्त असलेल्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणे राहू शकतो हेच गौतम बुद्धाच्या तत्वाज्ञानाचे गमक असल्याचे प्रतिपादन मारेगाव येथील पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ यांनी केले.
मारेगाव येथील धम्मराजिका बुद्ध विहारात बुद्ध रुपाचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.
सकाळी शेकडो उपासकांनी याप्रसंगी सामूहिक त्रिशरण पंचशील घेत सामुहीक बुध्दवंदना घेण्यात आली. तत्पूर्वी विहार परिसरातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बालक अनुयायी अनुयायीनी बुद्धाच्या जीवनावर प्रकाश टाकला. उपासक उपासिकेंनी बुद्ध गीते सादर केली.याप्रसंगी ठाणेदार शंकरराव पांचाळ, अभियंता शैलेंद्रकुमार पाटील यांनी बुद्ध पौर्णिमेचा हा चंद्र सर्वांच्या आयुष्यातील दुःख नाहीसे करून सुख, शांती व समाधान निर्माण करो अशा शब्दरूपी शुभेच्छा प्रदान करीत उपस्थितांनीही एकमेकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यात.
सायंकाळी बुद्ध रूपाच्या प्रतिमेची शांती कॅण्डल मार्च शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत रॅली काढण्यात आली.धम्मराजिका बुद्ध विहारात सामूहिक बुद्धवंदनेने सांगता करून बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रबोधनात्मक सूत्रसंचालन आयु. गौतम मालखेडे यांनी केले.उपासिकेंनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.