मारेगावात अनोख्या लग्नाची चर्चा.. नवरीची वरात थेट घोड्यावरून !

 

– मुलगा मुलगी भेद न मानता वधुमातेचा सामाजिक संदेश
– प्रत्यक्ष बघणारे व नेटीझन्स कमालीचे आश्चर्यचकीत

मारेगाव : दीपक डोहणे
भुतकाळात मुलगी म्हणजे डोक्यावरचं ओझं. ही समज समाजात रूढ होती. कालांतराने हायटेक जमाण्यात धकाधकीसह महागाईचा काळात हा काळ व धोरण काही डोळस व्यक्तीमुळे बदलत गेला.आणि आपल्या समाजात लग्न वरातीत केवळ मुलालाच घोड्यावर बसविले जाते. पण मारेगावात एका मातेने मुलगा मुलगी भेद न मानता आपल्या लाडक्या लेकीची वरात थेट घोड्यावर बसवून काढली. तीला धूमधडाक्यात निरोप देण्यासह समाजाला स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला. या मारेगावातील अनोख्या घोड्यावरील नवरी वरातीच्या खमंग चर्चेला चांगलेच पेव फुटले आहे.

मारेगाव तालुक्यातील सिंधी हे मुळ गाव असलेल्या शेतकरी वडील रमेश चवले यांचा काही वर्षांपूर्वी अचानक मृत्यू झाला.कालांतराने मुलीच्या शिक्षणासाठी दोन लेकी व माय मारेगाव येथे वास्तव्यासाठी आलेत. दोन मुली असतांना आई वंदनाबाई हिने मुलींची जबाबदारी सक्षमपणे पेलविली. मुलींना मनाजोगे शिक्षण दिले.दोन्ही लेकीच्या उज्वल भविष्याचे स्वप्न बघत असतांना काही दिवसापूर्वी थोरली कन्या “शारदेश्वरी” हिचे लग्न तालुक्यातील कोलगाव येथील हेमंत राजु अवताडे हे कोलमाईन्सला नोकरीं असलेल्या मुलाशी जुळले. यावेळी मुलीला वडील नसलेल्या आईने या आनंददायी लग्नप्रसंगी मुलीची वरात घोड्यावरून काढण्याचे ठरविले.

आज मारेगाव येथे दि.21 मे 2024 मंगळवार ला नियोजित बदकी भवनात पार पडलेल्या लग्न प्रसंगी थेट निर्मिती लेआउट मध्ये वास्तव्यात असलेल्या निवासा पासून हा सोहळा थाटामाटात करण्यासाठी नवरी मुलगी थेट राज्य महामार्ग ते घोंसा रोडने घोड्यावरून विवाह स्थळी पोहचली. मारेगावात बहुदा पहिल्यांदाच एखाद्या नवरीने घोड्यावरून विवाहस्थळी मार्गक्रमन करणारा प्रसंग गावकऱ्यांनी डोळ्यात साठविला. नव्हेतर कुतूहलाने या अनोख्या लग्नाची चर्चा चांगलीच भाव खावून गेली.पारंपारिक प्रथांना कलाटणी देत ही शारदेश्वरी नवरी घोड्यावर बसली आहे. हे प्रत्यक्ष बघणारे कमालीचे आश्चर्यचकीत होत होते .

दरम्यान, दोन पोटच्या लेकीच्या शिरावर पितृछाया नसतांना त्यांची उपेक्षा होवू दिली नाही. एकाकी संघर्ष करीत मुलींना कोणतीही उणीव भासू दिली नाही.हा प्रसंग आनंदात साजरा व्हावा व मुला पेक्षा मुलगी कमी नाही. ती एक नव्हे तर दोन घरे प्रकाशमान करते हा खरा संदेश समाजात पोहचावा हीच अपेक्षा आहे. अशा भावना नवरी मुलीची आई श्रीमती वंदनाबाई रमेश चवले यांनी ‘विटा’ शी बोलतांना व्यक्त केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment