– पळसाचे पान अन बिसलेरितून झूरके
– पालकांनी सजग होण्याची गरज
– छातीचा पिंजरा अन कर्करोगाला आमंत्रण
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगावच्या तरुणात अफू, गांजा आणि चरस ची क्रेझ वाढली आहे. यात प्रामुख्याने कॉलेज तरुण आहारी गेल्याचे भयाण वास्तव निर्जनस्थळी भल्या पहाटे व रात्री निदर्शनास येत आहे.त्यामुळे पालकांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा आपल्या पोटाचा गोळा ऐन यौवणाच्या उंबरठ्यावर खिळखीळा होण्याच्या मार्गांवर आहे.
मारेगाव शहरालगत अनेक निर्जनस्थळी, प्रामुख्याने खुल्या लेआउट मध्ये युवकांचा समूह पळसाच्या पानाची पुंगळी करीत दम दमा दम चे झूरके ओढते आहे. आता नविन शक्कल लढवित बिसलेरी बॉटलला दोन भोकं पडून त्यात काही प्रमाणात पाणी टाकून चरस, अफू व गांजा टाकत आहे. दोन्ही छिद्रात पळसाच्या पानाची बिडी सदृश्य पुंगळी टाकून झूरके ओढण्याचे सत्कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
आपला मुलगा नेमका काय करतो याची भनक नसलेले पालक, मुलाच्या व्यसनाधीन पासून पूर्णतः अनभिज्ञ् आहे. या भयावह व्यसनाने मायबापाचा काळजाचा तुकडा खिळखीळा होत आहे. यामुळे छातीच्या कर्करोगाला शरीराच्या कवेत घेत आहे. हे भयानक चित्र मारेगावच्या सर्वच खुल्या लेआउट मध्ये निदर्शनास येत आहे.
खुलेआम सुरु असलेल्या व्यसन करिता अफू, गांजा आणि चरस ची खेप नेमकी कुठून येते, कोण कोण विक्री करतोय याचा छडा लावण्याचे कडवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असून सामाजिक दायित्व स्वीकारून पोलिसांनी दम दमा दम चा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मारेगावचे पानठेले झाले अफू, कोकीन, चरस, गांजाचे अड्डे
परप्रांतातून येणारी खेप मारेगावच्या काही निवडक पानटपरिवर बिनधास्त विकल्या जात आहे. काहींनी खासगीत तर सालेभट्टीत अफू, गांजा, कोकीन, अफीम विक्रीचा जोरकस गोरखधंदा चालविला असल्याची अधिकृत माहिती “विटा” ला प्राप्त झाली आहे.
या भयानक व्यसनाने युवकांचे जीवन अधांतरी आहे.नशेखोरीत गुंतलेली व छातीचा पिंजरा झालेली तरुणाई मारेगावात पट्टा गँग, सरकार गँग, सेठ गँग ने सुपरिचित झालेली आहे.
गांजा, चरस, अफू व कोकीनच्या गंगेत पुरते बेभान झालेले युवक दारूच्या बॉटल्स फोडून ऐन लेआउटच्या भर रस्त्यावर काचा फोडून डोक्यात शिरलेल्या नशाने लेआउट वरील वाकिंग /व्यायाम करणाऱ्यांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे. परिणामी, नशा करणाऱ्या साहित्या सह सरकारी व खासगी फुग्याचा खचही निदर्शनात येत आहे. तरुणाईला आता अफीम,कोकीन सारख्या महाभयंकर ड्रग्सने चांगलाच विळखा घातला आहे.
मारेगाव शहरात हजारो घरातील कोवळी मुलं व्यसनेच्या मायाजालेत दम मारो दम ने बेभान होत आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यांसाठी हा प्रश्न मारेगावकरांसाठी गंभीरतेने गडद होत चालला आहे. येणारा काळ व्यसनाधीन युवकांना काळोखाची वाट दाखवित असतांना प्रशासन अन पालकांनी आता सजग होण्याची गरज नितांत बनली आहे.