गुरांच्या गोठ्यातून बोगस बियाणाच्या विक्रीवर छापा

 

जिल्हा पथकाने चिंचाळा येथून लाखो रु. ची बीटी बियाणे केले हस्तगत

– मारेगाव पोलिसात गुन्हे दाखल : संशायित घटनास्थळावरून पसार

मारेगाव : दीपक डोहणे

शेतीपयोगी बियाणे घेण्याची शेतकऱ्यांच्या लगबगीचे दिवस ऐरणीवर असतांना मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे थेट पशुधनाच्या गोठ्यातून सर्रास अनधिकृत बियाणे व फवारणीचे औषधी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा कृषी पथकाने छापा टाकून किमान लाखा वरील रु.चे बियाणे हस्तगत केली. छापा पडताच संशायित विक्रेत्याने घटनास्थळा वरून पोबारा केला. परिणामी, पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शेतीपयोगी साहित्य खरेदी विक्री चा हंगाम तोंडावर असतांना मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथील विलास वसंत चिकटे यांनी अनधिकृत सहा प्रकारच्या विविध बोगस कंपन्यांचे बियाणे परवाना नसतांना थेट पशुधनाच्या गोठ्यातून हा बनावट बियांणे विक्रीचा गोरखधंदा सुरु केला. याबाबतचा गोपनीय कानोसा माहिती जिल्हा कृषी पथकाला लागताच आज दि.9 मे रोजी सकाळी 11 वाजता गोठ्यात छापा टाकला. छापा टाकताच विक्रेत्याने घटनास्थळा वरून धूम ठोकली. या छाप्यात 78 पॉकीट बियाणे किमान एका लाखावरील किमतीचे बोगस बियाणे हस्तगत करण्यात आले .या गोरखधंद्यात आजतागायत संशायिताने 5 लाख रुपयांचे वर विक्री केल्याचा कयास छापा पथकांनी व्यक्त केला आहे. याबाबतची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार विलास चिकटे रा. चिंचाळा ता. मारेगाव यांचेवर भांदवी 420 /34 बियाणे कायद्याचे 7/8/9/10/11/12/13/14/ पर्यावरण संरक्षण 1986 चे कलम 7/15 कायदा अंतर्गत चिकटे यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.तूर्तास संशायित पसार आहे.

 

पथकात मारेगाव तालुका कृषी अधिकारी सुनिल निकाळजे, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माडोरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील,संदिप वाघमारे कृषि अधिकारी पंचायत समिती मारेगांव यांनी ही कारवाई केली. दरम्यान, मारेगाव तालुक्यात बोगस बियाणे विक्रीची व्याप्ती या घटनेवरून अधिकाधिक असल्याच्या शंकेला आता पेव फुटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment