बोटोणीत हृदयद्रावक…. अखेर नवविवाहीत महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

 

मातृत्वाच्या ओढीने 14 दिवसाचे बाळ कायम व्याकुळ

– मन हेलावणाऱ्या घटनेने पंचक्रोशी हादरली

बोटोणी : सुनिल उताणे 

विपुल अन शुभांगी मागील वर्षी जीवनाच्या घठ्ठ बंधनात अडकले. त्यांच्या संसारवेलीवर अवघ्या 14 दिवसापूर्वी एक नवजात गोंडस बाळ जन्माला आले . निरागस पाहुण्याच्या आगमनाचा कुटुंबात आनंदाचा पारावार असतांना शुभांगी मंगळवारला मध्यरात्री सुमारे 2 वाजताचे दरम्यान बाळाला सोडून निघून गेली अन तिचा मृतदेहच गच्च भरलेल्या वस्तीतील मधोमध असलेल्या सरकारी विहिरीत सायंकाळी 6 वाजता आढळल्याने अख्ख गाव अन पंचक्रोशी शोकसागरात बुडाली.

मारेगाव तालुक्यातील भाजपचे जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे व माजी पंचायत समिती सदस्या सुनीता लालसरे यांचा थोरला सुपुत्र विपुल याचा विवाह 16 एप्रिल 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बेलसणी ता. भद्रावती येथील वामन मिलमिले यांची मुलगी शुभांगी हिच्याशी झाला होता.

विपुल हा वणी येथील एका बँकेत रोखपाल म्हणून कार्यरत असतांना विपुल अन शुभांगीला मागील 24 एप्रिल 2024 ला पुत्ररत्न प्राप्त झाला. सर्वत्र कुटुंबात हर्षानंद असतांना शुभांगी ही मंगळवार ला गोंडस बाळाला सोडून मध्यरात्री घरून निघून गेली. सकाळ पासून अख्खा गाव स्वयमस्फूर्तीने बोटोणी जंगल व्याप्त परिसरात पालथे घालत शोधार्थ असतांना शुभांगीचा थांगपत्ता लागला नाही. सायंकाळी हताश होत शेकडो ग्रामस्थांनी गावाकडे कूच केले.

गावातच असलेल्या सरकारी विहिरीच्या काही अंतरावर जलवाहिनीत एकास चप्पल आढळल्याने शंकेला वाव मिळाला. काहींनी गळ टाकण्याच्या प्रयत्नात शुभांगीचा मृतदेहच आढळल्याने अख्ख गाव शोकसागरात बुडाले.

या मन हेलावणाऱ्या घटनेने पंचक्रोशी पुरती हादरली असून बाळंतीण होवून अवघ्या 14 दिवसाचे बाळ मातृत्वाच्या ओढीने कायम व्याकुळ झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment