हृदयद्रावक…! कोवळ्या काव्याला झोपेतच मन्यार नागाचा दंश

 

– उपचारासाठी नेत असतांना वाटेतच थांबला श्वास

– टाकळी (कुंभा ) येथील घटनेने पंचक्रोशीत हळहळ

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

तालुक्यातील टाकळी येथे घरी मायलेकी खाली झोपून असतांना भारतातील सर्वात विषारी साप असलेला मन्यार जातीच्या नागाने अवघ्या 14 महिन्याच्या कोवळ्या छकुलीला दंश केल्याने तिचा उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.ही दुर्देवी घटना आज मध्यरात्री 2 वाजताचे दरम्यान घडली.

मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील निवासी आई पल्लवी व अवघ्या 14 महिण्याची आईच्या कुशीत निद्रावस्थेत असलेली काव्या वैभव खेवले ही खाली साखरझोपेत होती. अशातच मध्यरात्री 2 वाजताचे सुमारास अंदाजे साडेतीन फुटाचा मन्यार जातीचा नाग त्यांच्या अंथरुणात शिरला व काव्याला अलगद पायाला दंश केला. दंश करताच काव्या रडायला लागली.आईला जाग येताच शेजारी विषारी साप निदर्शनास आला.आरडाओरड करताच शेजारील काहींनी तो साप पकडला.

 

काव्याला लागलीच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथे ठोस उपचारपद्धती नसल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलवित असतांना काव्याचा सकाळी 6 वाजता दुर्देवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, वडील वैभव खेवले हे मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये होमगार्ड म्हणून कर्तव्यावर होते.

 

व्यवस्थेची बळी ठरल्याचा आरोप

काव्याला उपचारासाठी मारेगाव येथे दाखल करताच विहीत वेळेत व पाहिजे तसा उपचार झाला नसल्याचा आरोप काव्याच्या नातेवाईकांनी करीत प्रशासनाच्या बेताल पद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. किमान ठोस उपचार झाला असता तर कदाचित काव्याचा जीव वाचला असता असा आर्त टाहो फोडत नातेवाईकांनी छकुली ही व्यवस्थेची बळी ठरल्याचा आरोप केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment