– लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा टोकाचा निर्णय
– संवेदनशील प्रश्नावर प्रशासन पडले थिटे
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
भारत देश एकीकडे चंद्रावर यशस्वी वाटचाल केल्याबद्दल आपली पाठ थोपटून घेत असतांना खेड्यातल्या भारतात अनेक प्राथमिक समस्या आवासून उभ्या आहे. मारेगाव तालुक्यातील कुंभा गावातील तीन व तालुक्यांतील पाच नागरीक 2018 पासून केवळ आपल्या हक्काचे राशन कार्ड मिळावे यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकले आहे. सरते शेवटी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानच करायचे नाही असा निर्धार या नागरिकांनी केल्याने प्रशासनात हलचल वाढली आहे.
मारेगाव तालुक्यातील कुंभा या गावातील रामचंद्र महाडुळे ,विनोद चहारे ,वसंता धोटे, यांचे त्यांच्या वडीला कडून नाव कमी करणे व इतर तस्सम कारणामुळे सन 2018 मध्ये एका राशन कार्ड वरून नाव कमी झाले .त्या अनुषंगाने दुसरे स्वतःचे हक्काचे राशन कार्ड तयार व्हावे यासाठी त्यांनी मारेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात रीतसर सर्व कागदपत्रासह अर्ज दाखल केला. साहेब आज नाही, उद्या या ,साहेब दौऱ्यावर गेले या नेहमीच्या प्रशासकीय डायलॉग बाजी मध्ये त्यांच्या चपला झिजल्या. शेवटी हे प्रकरण जिल्हा सूचना केंद्र (nic) यांच्याकडे गेले .मात्र हे तांत्रिक अडचणीचा तिढा सुटता सुटेना झाला. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने ह्या गंभीर प्रश्न मंत्रालयीन स्तरावर पोहोचवला. सार्वजनिक वितरण व्यवस्था व अन्नपुरवठा मंत्रालयांच्याकडे अजूनही या समस्येचा निपटारा होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. यामुळे राशन कार्ड असणे आवश्यक आहे अशा संबंधित योजनांमध्ये या कुटुंबांची अवस्था “ना घर का, ना घाट का “अशी झाली आहे.
राशन कार्ड नसल्यामुळे शासनाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या लाभासह इतर लाभ देखील मिळेनासे झाले आहे. त्यामुळे आठही कुटुंबानी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धाव घेतली.मात्र याचाही उपयोग शून्य झाला.
एकीकडे भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत सामील होत असल्याच्या चर्चा सुरू असतांना खेड्यातल्या गरीब कुटुंबांना साधे राशन कार्ड अभावी अन्नही मिळू नये हे संवेदनशील चित्र बरेच काही सांगून जात आहे. यामुळे आता आपल्या दारावर मस्तक टेकून मताचा जोगवा मागणाऱ्या उमेदवारांना परतून लावण्याचा निर्धार ह्या आठही कुटुंबांनी केला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत हे आठही कुटुंब चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्राकरिता कोणी कितीही मनधरणी केली तर मतदान करणार नाही. त्यांच्या ह्या निर्णयामुळे प्रशासनामध्ये मोठी हलचल निर्माण झाली आहे. त्यांच्या ह्या राशन कार्डचा तिढा सुटत नसेल तर इतर प्रश्नांचे काय असा संतप्त सवाल हे कुटुंब करीत आहे.
तहसीलदार यांना अनेकदा भेट घेतली. तांत्रिक अडचणीचे कारण त्यांनी पुढे ठेवले. एक-दोन दिवसात होईल असे पोकळ आश्वासन देत परत पाठवण्यात आले.
-रामचंद्र महाडूळे, वंचित लाभार्थी, कुंभा
मी जिल्हा पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची अनेकदा फोनवर चर्चा केली पण काही उपयोग झाला नाही.
–वंदना चहारे, वंचित लाभार्थी, कुंभा
तालुक्यातील आठ नागरिकांचा राशन कार्ड चा प्रश्न हा तांत्रिक अडचणीत सापडला आहे. याबाबत मी डी एस. ओ. साहेबांना माहिती दिली आहे.
– उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव