– वारे व्वा कारभार म्हणण्याची वेळ
– निधीचा अपव्यय : सत्ताधारी व विरोधकांची चुप्पी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ दोन महिने उलटले असताना कुंभा ते गदाजी (बोरी) हा रस्ता जागोजागी उखडला आहे. सहा किमी रस्त्या करिता भरभक्कम सहा कोटीच्या निधी प्राप्त झाला. मात्र रस्त्याची 60 दिवसात चाळणी झाल्याने शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. त्यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कुंभा ते गदाजी (बोरी) हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची जागोजागी चाळणी झाल्याने विविध सामाजिक व राजकीय संघटनेद्वारे निवेदन देऊन रस्त्याची मागणी रेटल्या गेली होती. रस्त्याच्या मागणीची दखल घेत शासनाने सदर रस्ता मंजूर केला व सहा किमी. रस्त्या करिता भरभक्कम निधीची तरतूद केली. सहा किमी. रस्त्यासाठी शासनाने सहा कोटी मंजूर करून कामाचे कंत्राट काढले. मलींदा लाटण्याच्या उद्देशाने अनेक कंत्राटदारांच्या या रस्त्याकडे नजरा खीळल्या होत्या. मात्र एका मर्जीतील कंत्राटदाराने सदर रस्त्याचे कंत्राट मिळविले. रस्ता मजबूत होऊन गुळगुळीत होणार असल्याने वाहनधारकासह नागरिकांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले.
मात्र, सदर रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संबंधित अभियंत्यास अनेकांनी ही गंभीर निदर्शनास आणून दिली. याकडे अभियंत्याने सपशेल दुर्लक्ष केले. दोन महिन्यापासून संबंधित रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतुकीकरिता सुरू झाला. रस्ता गुळगुळीत झाल्याने रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक महिने स्थानिकासह वाहनधारकांना झालेले गैरसोयीतून सुटकेचा श्वास घेतला. मात्र हा श्वास औटघटकेचा ठरला. दोनच महिन्यात रस्ता जागोजागी उखडत चालला आहे तर अनेक ठिकाणी रस्त्याला तडे जात आहे. त्यामुळे सहा कोटीच्या निधीचा दुरुपयोग झाला असल्याची खंत नागरिकात व्यक्त होत आहे.
संबंधित रस्ता कंत्राटदाराचे कुरण ठरला आहे .त्यामुळे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
सदर रस्त्याला काही ठिकाणी उखळला आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसेल असे वाटते. तरी लवकरच रस्ता मजबूत बनवला जाईल.
–सुहास ओच्यावर
उपविभागीय अभियंता
सा. बा. विभाग मारेगाव
लीपा पोती करण्याची पाळी
सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जात झाल्याने रस्ता उघडत चालला आहे तर काही ठिकाणी रस्त्याला तडे गेल्याने आता ह्या रस्त्याची लिपापोती करून पाप झाकण्याची वेळ आली आहे.