– प्रकरणात पडद्यामागील खलनायकाच्या अटकेची मागणी
– मारेगाव प्रेस संपादक पत्रकार संघांचे वरिष्ठाकडे तक्रार : आंदोलनाचा ईशारा
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील खडकी (बु.)येथील मदतनीस हिच्या गैरवर्तणुकीने व्यवस्थापन समितीने ठराव घेत हकालपट्टी केली. याचा रोष व्यक्त करतांना थेट येथील शिक्षकांसह मारेगाव येथील तिळमात्र संबंध नसतांना दोन पत्रकारांची खोटी तक्रार पोलिसात केल्यागत तब्बल अठरा दिवसानंतर गुन्हे दाखल केले. पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल केल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे व यामागील षडयंत्र रचणाऱ्या खलनायकांचा कसून शोध घेवून अटक करण्यात यावी.या खोटारड्या मानसिकतेची तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतीक वर्तुळात संतापाची लाट पसरत आहे.याबाबतचे निवेदन प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघ मारेगाव तालुकाचे वतीने वरिंष्ठाना देण्यात आले आहे.यावेळी संघटनेकडून तीव्र शब्दात निषेध नोंदवत सात दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषण छेडण्याचा ईशाराही देण्यात आला.त्यामुळे हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फिर्यादी खडकी येथील मदतनीस ही शालेय पोषण आहारात अनियमितता दाखवित असल्याने तीला शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेत हकालपट्टी केली. परिणामी, हा ग्रामस्थांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर मारेगाव येथील एका बेताल इसमाकडून प्रकरणाचा भडका उडविण्याचा प्रयत्न सुरु असतांना खडकी येथील महिलांचा जमघट मारेगाव येथे डेरेदखल होत प्रसादाच्या मेजवानीत थोडक्यात बचावला होता. याचा वचपा काढण्यासाठी येथील शिक्षकांवर दहा फेब्रुवारी रोजी विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीत व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या माध्यम क्षेत्रातील दोन पत्रकारांचे नाव गोवण्याचे नेहमीप्रमाणे येथील तथाकथित वार्ताहर याने षडयंत्र रचले. आणि तक्रारीची शहानिशा न करता येथील अधिकाऱ्याने तब्बल 29 फेब्रुवारी ला मध्यरात्री तीघांवर विनयभंग सारखा लांच्छानास्पद गुन्हा दाखल केल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.
या प्रकरणाची निष्पक्षपणे सखोल चौकशी करून तत्कालीन ठाणेदार खंडेराव यांना निलंबित करण्यात यावे. यात पडद्यामागून खलनायकाची भूमिका वटविणाऱ्यांची सखोल व चौकशी करून अटक करण्यात यावी व लादलेले खोटे गुन्हे रद्द करावे अशा आशयाचे निवेदन प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघ मारेगाव तालुकाचे वतीने गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, पोलीस अधिक्षक यवतमाळ, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तहसीलदार मारेगाव, ठाणेदार मारेगाव यांना देण्यात आले आहे. दरम्यान विशेष चौकशी समिती नेमून सदर प्रकरणाच्या मुळाशी जावून खऱ्या खलनायकाचा मुखवटा जनतेसमोर आणण्यात येवून त्यांना अटक करावी अन्यथा सात दिवसानंतर या प्रमुख मागणीसाठी उपोषण च्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देतांना याप्रसंगी पत्रकार संघटना मारेगाव व वणी येथील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.