– खुद्द तहसिलदार निलावाड यांची पोलिसात तक्रार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव तालुक्यात कोसारा, सोईट सह इतर नाल्यातून वाळूची तस्करी करतांना तस्करांनी ‘खबऱ्यांची’ नियुक्ती करीत शासनाच्या महसूलला चुना लावण्याचा गोरखधंदा सर्वश्रुत असतांना आता मारेगाव तहसीलदार यांनी तस्करासह खबऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा विडा उचलला आहे. तहसीलदार यांच्या वेगवेगळ्या क्लूपत्यांनी दहशतीत भर पडत असतांना आता खबऱ्यांच्या विरोधात दंड थोपटून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याने खबऱ्यांनी सावध होण्याचा गर्भीत ईशारा देण्यात आला.
मारेगाव तालुक्यात दोन डझन पेक्षा जास्त वाळू तस्कर सक्रीय असून पावसाळ्यापूर्वी घाट आणि नाल्यातील वाळू फस्त केल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडीत काढला.आपले इप्सीत साध्य करण्यासाठी तस्करांनी शक्कल लढवीत गावाच्या चौफुलीवर ‘खबऱ्या’ ला ठेवून थेट प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे लोकेशन मिळविने सहज शक्य होत होते. यात एका प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग चर्चेचा विषय ठरला. व त्या प्रशासनाने एकही कारवाई केली नसल्याने नेमके तस्करा सोबत कुणाची दिलजमाई होती ही कुण्या भविष्यकाराला विचारण्याची गरज उरली नव्हती.
दुसरीकडे महसूल विभागाचे अधिकारी यांनी सतर्कता दाखवीत अनेक तस्करांचे कंबरडे मोडले. दापोरा येथील कारवाईत खबऱ्यांनी माहिती देताच मोठी कारवाई फसली मात्र जेसीबी मशीन व ट्रॅक्टर महसूल च्या गळाला लागला.
हे खबरे नेमके कोण? याचा शोध घेणे तूर्तास पोलिसांसमोर तगडे आव्हान असले तरी तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीचा फास कुठपर्यंत आवळल्या जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. थेट तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीने खबऱ्यांनी सावध पवित्रा घेणे गरजेचे झाले असून तहसीलदार निलावाड यांच्या आक्रमक भूमिकेने वाळू तस्करात धडकी भरली आहे तर वाळू तस्करांच्या खबऱ्यांना शोधणे हे पोलिसांसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे.