– जेसीबी मशीन व ट्रॅक्टरवर टाकला महसूल विभागाने छापा
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील दापोरा पुलातील जेसीबी मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू उपसा करीत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाने छापा टाकत दोन्ही वाहनावर जप्तीची कारवाई मंगळवारला मध्यरात्री केली. सातत्याने तहसीलदार अवैध तस्करांचे कंबरडे मोडत असतांना मुजोर वाळू तस्करांचा वाळू चोरीचा सिलसिला कायम असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यात वाळू तस्करांचे मनसुबे फोफावले असतांना येथील तहसीलदार उत्तम निलावाड हे स्वतः अँक्शन मोडवर येत पथक कार्यान्वित केले.यात मागील दोन महिन्यात अनेक वाहनावर धडक कारवाई करून तस्करांचे मनसुबे हाणून पाडले. त्यामुळे कमालीचे तस्कर दहशतीत आले आहे. किंबहुना पथकात हयगय केल्यास एका कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय सेवेतील पारदर्शकतेच्या मूल्यमापनाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे.
दरम्यान, सातत्याने अवैध वाळू तस्करावर केल्या गेलेल्या कारवाईनंतरही वाळू तस्करांच्या मुजोऱ्या कायम असतांना मंगळवारला रात्री दापोरा शिवारातील पुलातील मध्यरात्री वाळू चक्क जेसीबी मशीन लावत ट्रॅक्टर मध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच महसूल पथक घटनास्थळी धडकत जप्तीची कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांचेसह तलाठी कुडमेथे, सोयाम, मडावी यांनी केली.परिणामी, जप्तीची कारवाई केलेल्यात जेसीबी मशीन महादापेठ तर ट्रॅक्टर वाहन चिंचमंडळ येथील असल्याची माहिती “विदर्भ टाईम्स” ला सर्वप्रथम प्राप्त झाली आहे.
पुलाच्या बांधकामावर जातेय नाल्यातील रेती..?
दापोरा पासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यालगत पुलाचे बांधकाम सुरु आहे. या पुलाला ‘उपाश्या’ पूल म्हणून संबोधल्या जाते. लाखो रुपयांच्या खर्चित कामावर नाल्याची निकृष्ठ दर्जाची वाळू वापरण्यात येत आहे. त्यामुळे पुलाचे बांधकामाला निकृष्ठ दर्जा चिकटला आहे.सदर कामावर यापूर्वी किमान दहा ते पंधरा ट्रॅक्टरभरलेला वाळू साठा जमा आहे. त्यावरही महसूल विभागाची सकारात्मक कारवाई अनिवार्य आहे.त्या वाळू साठ्यावरील कारवाई कडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.