– मारेगाव नवरगाव रस्त्याची दुर्दशा
– कान्हाळगाव ग्रामस्थांचे दुरुस्तीसाठी साकडे
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव व्हाया कान्हाळगाव ते नवरगाव रस्त्याची पूर्णतः चाळणी झाली असून वाहने तर सोडाच पायदळ चालणे दुरापास्त झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून कंबरडे मोडणाऱ्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने आगामी महिन्यात होणाऱ्या नवरगाव यात्रेकरुंना तात्पुरता दिलासासाठी रस्त्याची डागडुजी करावी अशी आर्त हाक कान्हाळगाव वासियांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मारेगाव येथून दक्षिणेस तीन किमी. अंतरावर असलेल्या तुळसामाता देवस्थानात महाशिवरात्री पर्वावर शंकरपट व भव्य यात्रा तब्बल सात दिवस चालतात. येथे येणारा भाविक हा कोसोदूरून येत असतो. मात्र मारेगाव पासून कान्हाळगाव मार्गे नवरगाव यात्रेत जाणाऱ्या रस्त्याची पूर्णतः चाळणी होत गिट्टी बाहेर पडून रस्ताच एका बाजूस गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे वाहने तर सोडाच पायदळ चालणे दुरापास्त झाले आहे. किंबहुना शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रसूती साठी नेणाऱ्या महिलांना असह्य वेदना सहन करावे लागत आहे.
दरम्यान, अवघ्या दिवसावर येवून ठेपलेल्या तुळसामाता देवस्थानात भरणाऱ्या यात्रेकरुंची ससेहोलपट होणार आहे.या रस्त्याची लागलेल्या वाटेने अपघाताची संभाव्य शक्यता बळावली आहे. त्यामुळे डांबरीकरण नाही तर किमान यात्रेपूर्वी सदरील रस्त्याची डागडुजी करून पॅचेस करीत मुरूम भरावा अशा आशयाचे साकडे कान्हाळगाव वासियांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे सह कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे घातले आहे.