– जगन्नाथ बाबाचे महात्म पंचक्रोशीत प्रसिद्ध
मारेगाव : दीपक डोहणे
संपूर्ण विदर्भात व इतरत्र ख्यातनाम असलेल्या विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा महाराज यांचा लौकिक सर्वत्र मोठया प्रमाणात पसरला आहे. दर महिन्याच्या 16 तारखेला या परिसरातील असंख्य भक्त त्यांच्या अध्यात्मक शक्तिपुढे मनोभावे नतमस्तक होतात.
विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज यांची किमया अगाध होती. त्यांची दमणी ज्या मार्गाने निघाली त्या मार्गाने भक्त त्यांच्या चरणी लीन होत असत.विशेष म्हणजे मारेगाव तालुक्यातील वेगाव ची ओळख जगन्नाथ महाराज यांच्या पावन स्पर्शाने सर्वत्र पसरली आहे. दरमहिन्याची 16 तारीख भाविक भक्तांसाठी एक पर्वणी असते. बाबांनी कोणत्याही सांसारिक मोहमाया पासून अलिप्त राहून या परिसरातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत अध्यात्माची पेरणी केली. आणि म्हणूनच या तालुक्याला भक्तीरूपाने मोठा चाहता वर्ग बाबांचा अनुयायी म्हणून बाबांना मनोभावे पूजतात.
मारेगाव शहरापासून काही अंतरावर मोहितकर यांचे शेतामध्ये कधी दमणी मध्ये बसून बाबा यायचे. आणि या ठिकाणी भक्त मनोभावे त्यांचे दर्शन घेवून भक्तीरसात न्हावून निघायचे. ज्येष्ठ प्रतिपदेला म्हणजेच 18 मी 1996 ला महाराजांचा देह अनंतात विलीन झाला. नवतरुण पिढी आजही बाबांनी दाखविलेल्या सन्मार्गाला अनुसरून जीवन जगतात. वेगाव, भांदेवाडा, वणी, मारेगाव सह पंचक्रोशीत त्यांच्या भक्त गणाच्या श्रध्येमुळे अनेक लहान मोठ्या गावात जगन्नाथ बाबांचे मंदीर हमखास बघावयास मिळते. भांदेवाडा येथे लग्न सोहळ्यापासून अनेक धार्मिक सामाजिक व लोकपयोगी कार्यक्रमातून या परिसरातील लोक लाभान्विक होत असतात.
एवढेच नव्हे तर या पंचक्रोशीतील युवक बाबांच्या अनेक कार्यक्रमात स्वतःला निःस्वार्थपणे तन मनाने झोकून देतात. विशेष म्हणजे 16 तारीख बाबांचा जन्मदिवस असल्यामुळे दरमहिन्याच्या 16 तारखेला एक वेगळाच भक्तिमय माहोल परिसरात अनुभवास मिळतोय.