– अल्पवयीन मुलगी बारा दिवसापासून बेपत्ता
– मारेगाव तालुक्यातील वडिलाने दिली पोलीसात फिर्याद
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती हालाकीची. अख्ख कुटुंब मिळेल ते काम करायचे अन गुजरान करायची अशी त्यांची दिनचर्या. याच कुटुंबातील सतरा वर्षीय मुलगी कापूस वेचणीला गेली पण घरीच आली नाही. नातेवाईकांकडे शोधाशोध झाली मात्र कुठंच आढळली नसल्याने वडिलांने मारेगाव पोलिसात अज्ञाताने फूस लावून नेल्याची तक्रार दाखल केली.
मारेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेलं जमातीचं बहुल गाव.कुटुंबाच्या नाजूक परिस्थितीने ‘तिने’ दहाव्या वर्गापासून शाळा सोडली.मिळेल ते काम करायचे व कुटुंबाला तोडका आधार द्यायचा म्हणून कपाशीच्या हंगामात ती स्वगाव सोडून कापूस वेचणीसाठी काही महिला मजुर सोबत म्हैसदोडका शिवारात गत 14 डिसेंबर रोजी गेल्यात.
संध्याकाळी हे मंजूर आपल्या गावी पोहचल्या मात्र ती मजूर मुलगी घरी परतलीच नाही. कुटुंबातील सदस्यांनी गणगोतासह इतरत्र शोधाशोध केली . मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही.
परिणामी, वडिलाने मारेगाव पोलिसात अज्ञाताने फूस लावून मुलीला पळवून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेने पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी अज्ञाता विरोधात कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.