– राजरत्न आंबेडकर यांचे आवाहन
– मारेगावात धम्म क्रांती मेळावा
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
देशातील बौद्धामधील जातीची मानसिकता बदलवून संपवायची आहे. जातीच्या पठडीतून बाहेर पडा. आपण बौद्ध आहोत हे दाखवा. आगामी लोकसंख्या गणतीवेळी बौद्धच लिहा. जात लिहू नका. असे आवाहन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.
ते मारेगाव येथे रविवारला आयोजित धम्म क्रांती मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भन्ते धम्म ज्योती तर दिनेश हनुमंते, वैभव धयडगे, सतीश इंगोले, विजय भरणे, विशाल इंगोले, अर्जुन बरडे यांची विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
आंबेडकर पुढे म्हणाले, सध्या राज्यात 84 लाख बौद्ध लोकसंख्या आहेत.हा वाटा 0.06 टक्के आहे. बौद्ध लिहिले तर हा आकडा 5 कोटीवर जातोय. बौद्ध लिहिले तर शेड्युल कास्ट किव्हा जात लिहिले नाहीतर बौद्धाच्या सवलती व निधी मिळणार नाही हा भ्रम ठेवू नका. जनगणना जेव्हाकेव्हा होईल तेव्हा बौद्धांनी कॉलम मध्ये बौद्ध असाच उल्लेख करावा.जात विचारून किव्हा लिहून जगाशी असलेले नाते तोडू नका असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
याप्रसंगी बौद्धाच्या स्वतंत्र अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करतांना देशाच्या राज्यसभा, लोकसभा व विधानसभा सभागृहात अनु. जातीचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात असतांना संविधानातील आर्टिकल कमी करण्यास मूक संमती देत असल्याने हे दुर्देवी आहे.ही खंत व्यक्त करतांना बाबासाहेबांचे विचार संपविण्याचे षडयंत्र सुरु झाले असल्याने आता स्वतःची समाज व अर्थव्यवस्था का उभी होतं नाही याचे चिंतन करून कृतीत उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे.
या देशावर मूठभर लोकांचे सर्वस्व असतांना आता आपण संघटीत होवून व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. अल्पसंख्याकांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे.
बाबासाहेबांनी बँकेची व्यवस्था केली मात्र बौद्धांची बँक नाही. बौद्धाची स्वतंत्र अर्थव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याच्या माझ्या प्रयत्नाचे तुम्ही शिलेदार होण्याचे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
प्रस्थापित सरकार दुसऱ्याच्या व्यवस्था उभे करण्यात मशगुल आहे. आर्थिक परिस्थितीने येणाऱ्या काळात आपला मुलगा मोठ्या हुद्द्यावर जाणे अशक्यप्राय वाटत असल्याने आता संघटीत होवून अर्थ व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्या हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल.
धम्म मेळाव्याचे सूत्रसंचालन संगीता श्रीधर कयापाक यांनी केले.प्रास्ताविक स्मिता अमर पुनवटकर तर उपस्थितांचे आभार तेजस्विनी दिलीप शंभरकर यांनी मानले.