– नागरिक धडकले पो.स्टे. वर : कर्तव्यावर प्रश्नचिन्ह
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यात अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढून नागरिकांची डोकेदुखी वाढविली असतांना संबंधित विभागाची चुप्पी अनेकांचे कुटुंब उध्वस्त करण्यास पुरेसे ठरत आहे.यावर तात्काळ लगाम लावण्यासाठी शिवणी येथील नागरिकांनी पोलिसात साकडे घातले आहे.
तालुक्यातील सीमेवर असलेल्या शिवणी धोबे येथे अवैध दारू विक्री सह मटका जुगार जोमात आहे.अशीच स्थिती मारेगाव तालुक्यातील अनेक गावात असल्याने तालुक्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.
हे व्यवसाय नियंत्रित करण्यात पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक सपशेल अपयशी ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. परिणामी , अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात कौटुंबिक कलहात प्रचंड वाढ होत असतांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत असल्याची ओरड आहे.
दरम्यान , अवैधरित्या व्यवसायावर तात्काळ लगाम लावून बेड्या ठोका व गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी येथील नागरींकांनी मारेगाव पोलीस स्टेशनला साकडे घातले असून कारवाई कडे दुर्लक्ष केल्यास येथील नागरिक लवकरच पोलीस अधीक्षकांच्या दालनाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.यावेळी बहुतांश महिलांची उपस्थिती होती.
गावातील युवक आणि वाढत असलेला कौटुंबिक कलहाने अनेकांच्या घरातील अब्रू वेशीवर टांगल्या जात असतांना सामाजिक जाणीव अधोरेखित करून स्थानिक ग्रा.पं. ने हे व्यवसाय हद्दपार करण्यासाठी ठराव घ्यावा व व्यसनमुक्त गावाची वाटचाल करावी अशी मागणीही समोर येत आहे