– आता प्रदेश अध्यक्षांनी उपचार करावा
( भाग – 3 )
मारेगाव : दीपक डोहणे
काँग्रेसचे एकेकाळी असणारे वैभव आता तालुक्यातून ओसरण्याच्या मार्गावर आहे. पक्षाशी काहीच सोयरं – सुतक नसणारे जोकरछाप सध्या काँग्रेसची धुरा वाहत आहे. त्यामुळे “बुडत्याचे पाय डोहात” अशीच सध्या पक्षाची मारेगावात अवदशा झाली आहे.
काँग्रेसच, काँग्रेसला हरवू शकते असे सर्वत्र बोलले जाते. नेमके हेच कार्य तालुक्यात अनेकदा एका टोपीबाज नेत्याने इमाने – इतबारे पार पाडले आहे. लोकसभा, विधानसभा पासून झेड.पी.च्या निवडणुकीत या टोपीबाज नेत्याने अनेकवेळा पक्षाच्या उमेदवार विरुद्ध काम करण्यात अधिक रस घेतला आहे. हा आजवरचा इतिहास आहे. आणि तो तालुक्यात सर्वानाच ठाऊक देखील आहे. “त्यांनी भगवी काँग्रेस चालविली” असाही अनेकदा आरोप झाला.
मात्र या नेत्याचे सर्व चुका – पाप पोटात घालण्यात आले. सदर नेत्याची ही कावेबाज प्रवृत्ती हेरून एकाने डाव साधला. यावेळेस तमाशेबाज,जोकर छाप सावकाराने पॉकेट फेकून या नेत्याला आपल्या कवेत घेतले. अन् येथूनच काँग्रेसचा सर्वाधिक सत्यानाश व्हायला सुरवात झाली. सध्या काँग्रेसला जणू कॅन्सर झाला आहे. त्याचा वेळीच इलाज न झाल्यास तो संपूर्ण पक्षात पसरणार हे सांगायला आता कोण्या भविष्यवेत्याची गरज नाही.
टमरेल छाप, उचल्या लोकांनी कधीही पक्ष वाढत नसतो. पाठीशी पाच – दहाही लोकं नसणारे थिल्लर नेते येथे वरचढ ठरत आहे. सतरंज्या उचलणारे, चपला झिजवणारे निष्ठावंत बिचारे हा तमाशा बघून मुकाट्याने दूर झाले आहे. निवडणुकीत गजब व्यूहरचना आखणारे आणि एकहाती कांग्रेस चा विजय खेचून आणनारे आता घरी बसले आहे. केवळ पोष्टर बाजी करून निवडणुका जिंकता येत नाही. त्यासाठी भरपूर लोकसंग्रह पाठीशी असावा लागतो, हे काँग्रेस च्या जुण्या जाणत्या नेत्यांना पक्के ठाऊक आहे.
पण त्याला सध्या इलाज नाही. तसाही कॅन्सर वर इलाज नसतोच. शरीराचा एखादा भाग सडला तर कापून वेगळा करणे हाच त्यावर उपाय आहे. सावकार प्रेमाने आंधळे झालेल्या नेत्याचे ऑपरेशन करणे हाच आता संजीवनी उपाय वरिष्ठांनी करणे गरजेचे आहे. दुसरा होमिओपॅथी उपाय देखील आहे. अडवाणी,जोशी सारखे या खिळखिळ्या नेतृत्वाला रिटायर करून मार्गदर्शक मंडळी मध्ये टाकून देणे. अन्य पक्षांनी अशा उचापतींना आधीच कचराकुंडी मध्ये टाकण्याचे कठोर निर्णय घेतले. त्यातून पक्ष वाचविला अन् वाढविला देखील आहे.
२०२४ मध्ये लोकसभा – विधानसभाच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहे. आधीच देशभरात काँग्रेस समोर तगडे आव्हान आहे. पॉकेट फेकून पुन्हा निवडणुकीचा सत्यानाश होण्याची शंका नाकारता येत नाही असे एका कांग्रेस नेत्याने चिंतन व्यक्त केले आहे. “बडे भैय्या अन् छोटे भैय्या” कांग्रेसचा सत्यानाश करण्यावर टपून आपला सावकारी मतलब साधण्यासाठी आतुर झाले आहे. नेतागिरी करून गरिबांच्या शेती हडपणे हाच एकमेव उद्देश आहे.त्यांच्याकडून पॉकेट घेऊन पक्ष खड्यात टाकायला टोपीबाज तय्यारच आहे. निवडणुक प्रचार मध्ये सच्या कार्यकर्त्यांना शंभर रुपयाचाही हिशोब मागणारे, स्वतः पॉकेट घेतांना लाज सोडतात काय ? असा संतप्त सवाल हाडाचे काँग्रेस कार्यकर्ते करत आहे.गांधीवाद कधीचाच खुंटीवर टांगून आणि गांधीबाबा खिशात टाकून पक्ष टिकत नसतो. आता निष्ठावंताचा सत्यानाश करणाऱ्यांच्या बाबतीत प्रादेशिक काँग्रेस नेतृत्वाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्यातून काँग्रेस हद्दपार होणार.संपलेला पक्ष पुन्हा उभारता येणे किती कठीण आहे हे हजारो किलोमिटर चाललेल्या राहुल गांधीना विचारून पहा.वरिष्ठांनी हा गंभीर प्रकार समजून – उमजून घेणे महत्वाचे आहे अन्यथा “चांगला पक्ष होता बिचारा” असे म्हणण्याची वेळ पक्षावर येऊन ठेपणार एवढे मात्र निश्चित.
उलट्या बोंबा
पत्रकारिता हा समाजाचा आरसा असतो. येथे तालुक्यातील लेखण्या गोठल्या अन् पद्धतशीरपणे गोठवल्या गेल्या असतांना पत्रकारितेचे आव्हान आम्ही स्वीकारले. टोपीबाज अन् जोकर बाज यांची आपमतलबी युती झाली. आणि सर्वधर्म समभाव जपणाऱ्या गांधीवादी काँग्रेसचा मारेगाव तालुक्यात कसा सत्यानाश होत आहे हे आम्ही तीन भागात निर्भिडपणे मांडले. त्याने काहींना उल्टी – जुलाब झाला. आत्मचिंतन करण्यापेक्षा उलट चवताळून आम्हाला पाहून घेण्याची पोपटपंची आता सुरू झाली. हा प्रकार आम्हाला नवीन नाही. सत्य मांडण्याचा हा व्रत “विदर्भ टाईम्स” चा असाच कायम राहणार आहे. वाचकाच्या उदंड प्रतिसाद अन् पाठबळ यास शतशः नमन अन आभार !